महावितरणने राज्यातील शेतकऱ्यांकडून थकीत वीज बिलांची वसूली मोहीम जोरदार सुरू केली आहे. वीज बिल न भरल्यास विद्युत पुरवठा तोडण्यात येत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांसह अनेक नागरिकांना बसत आहे. वीज तोडल्यामुळे अनेक गावात वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे महावितरणच्या या मोहिमे विरोधात अनेक संघटना,भाजप नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. एकीकडे परिस्थिती सुरु असतानाच दुसरीकडे मात्र सत्तेतील एका मंत्र्याला रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधारातच भूमिपूजनचा कार्यक्रम पार पाडावा लागला. त्यामुळे या विषयाची जोरदार चर्चा सुरु होती.
याबरोबरच आजच संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा पुणे-सोलापूर मार्गावरील टेंभुर्णी येथे अडविला होता. शिवाय सक्तीच्या वसुलीतून शेतकऱ्यांची मुक्तता करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
त्यांनतर आज संध्याकाळी भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील शहा गावात 12 कोटी 15 लाख निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे-सोलापूर महामार्गानाजिक “शहा पाटी” येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे राज्यमंत्री भरणे यांना चक्क अंधारातच भूमिपूजनचा कार्यक्रम करावा लागला.
यावेळी स्वतः मंत्रीमहोदय यांना कार्यकर्त्यांना मोबाईलचे लाईट लावण्याच्या सूचना कराव्या लागल्या. त्यामुळे वीजतोडणी मोहिमेच्या प्रश्न राज्यात पेटलेला असताना सत्तेतील मंत्र्यानांच या वीज तोडणी मोहिमेचा फटका बसल्याचे यावेळी दिसून आले.