पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिलला देशवासियांना लाल किल्ल्यावरुन संबोधणार आहेत. गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्व निमित्ताने देशाला संबोधित करणार आहेत. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने सांस्कृतिक मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
यावेळेस मोदी जगभरातील सिख समुदायाला महत्त्वाचा संदेश देऊ शकतात. पंतप्रधान या दिवशी एक स्मारकाच्या नाण्याचं आणि टपाल तिकीटही जारी करतील, अशी माहिती सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात आली.
या कार्यक्रमात 400 सिख संगीतकार हे शबद कीर्तनाचं गायन करणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्रालयांनी दिली.
शीख गुरू तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि देशातील आणि जगातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून धार्मिक कार्यक्रमातून देशाला संबोधित करणार आहेत. याआधी पंतप्रधान मोदींनी 21 ऑक्टोबर 2018 ला स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारने आझाद हिंद सेनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लाल किल्ल्यावर एका समारंभाचे आयोजन केले होते.