क्रिप्टो करन्सीवर देशात गोंधळाची स्थिती असतानाच, आणि सरकारनं अशा करन्सीला मान्यता द्यायला नकार दिलेला असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालंय. मध्यरात्रीनंतर हॅकर्सनी हा प्रताप केलाय. मोदींच्या हॅक झालेल्या अकाऊंटवर बिटकॉईनच्या संदर्भात ट्विट केलं गेलंय. त्या ट्विटमुळे खळबळ माजली. कारण हे ट्विट सरकारनं बिटकॉईन्सच्या संदर्भात जो निर्णय घेतला त्याच्या एकदम उलटं आहे. पण नंतर नरेंद्र मोदी यांचं हे ट्विटर हँडल आता पुन्हा सुरक्षित केलं गेलंय.
रविवारी पहाटेच्या सुमारास म्हणजेच 2 वाजून 11 मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांचं ट्विटर हँडल हॅक करण्यात आलं. हॅकर्सनी मग त्याचा वापर बिटकॉईनच्या संदर्भात घोषणा करण्यासाठी केला. ‘भारतानं रितसर बिटक्वाईन कायद्याला मंजुरी दिली आहे आणि सरकार 500 BTC खरेदी करुन लोकांना वाटत आहे’ असं हॅकर्सनी ट्विट केलं. पण हॅकर्सचा हा गोंधळ फार काळ चालला नाही. दोन मिनिटानंतर हे ट्विट डिलिट केलं गेलं. नंतर पुन्हा 2 वाजून 14 मिनिटांनी पुन्हा ट्विट केलं गेलं. ज्यात पुन्हा आधीचाच मजकूर होता बिटक्वाईन्सला मान्यता देणार. त्यानंतर पुन्हा हे बेकायदेशीर ट्विटही डिलिट केलं गेलं. पण तोपर्यंत लोकांनी त्याचे स्क्रिनशॉट घेऊन व्हायरल केले. बिटकॉईन्स हा ज्वलंत प्रश्न आहे आणि एवढ्या मोठ्या निर्णयाचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले नाही तर नवलच. पण पुन्हा एकदा पंतप्रधानांचं ट्विटर हँडल सुरक्षित नसेल तर सामान्यांचं काय असा सवाल चर्चिला जातोय. मोदींच्या ट्विटर हँडलला गंभीर धोका असल्याचही जाणकारांना वाटतं.
पीएमओनं काय म्हटलंय?
पंतप्रधान मोदींचं ट्विटर हँडल हॅक झाल्यानंतर मोठी खळबळ माजली. त्यातही बिटकॉन्सच्या संदर्भात आधीच गोंधळ आहे. हॅकर्सच्या ट्विटनं त्यात आणखी भर पडली. पंतप्रधान कार्यालयानं नंतर रितसर ट्विट करत माहिती दिली- ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलशी छेडछाड केली गेली होती जी तात्काळ दुरुस्त करत सुरक्षित केली गेली. याची माहितीही ट्विटरला दिली गेलीय. ज्या काळात ट्विटर अकाऊंटमध्ये गडबड केली गेली, त्याकाळात केल्या गेलेल्या ट्विटसला दूर्लक्ष करा.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याची ही काही पहिली वेळ नाही. मोदींच्या पर्सनल वेबसाईटच्या ट्विटर हँडललाही हॅक केलं गेलं होतं. त्यावेळेस कोरोना रुग्णांसाठी दान बिटकॉईन्सच्या रुपात द्यावं असं सांगितलं गेलं होतं. अर्थातच नंतर हे ट्विट डिलिट केलं गेलं होतं.
ह्या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट लक्षात असावी की, भारत सरकारनं कुठल्याच क्रिप्टो चलनाला मान्यता दिलेली नाही. रिझर्व बँक ऑफ इंडियानं (RBI) त्यावर गंभीर चिंता व्यक्त केलीय. कारण क्रिप्टो करन्सीला मान्यता दिली तर सरकारच्या अस्तित्वावर, त्याच्या चलनावरच संकट येऊ शकतं असं जाणकारांना वाटतं. यासंदर्भातलं विधेयक लवकरच येण्याची शक्यता आहे.