दोन चारचाकींमध्ये लागलेल्या शर्यतीत एका कारने विक्रांत संतोष मिश्रा (वय 11, रा.एकनाथ नगर) या सायकलस्वार बालकाला उडविले. ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शहरातील मेहरुण तलावाकाठी घडली. हा अपघात इतका भयंकर होता की चारचाकीच्या धडकेत विक्रांत चेंडूसारखा 15 फूट वर फेकला गेला. डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. चारचाकी चालविणारा देखील 16 वर्षाचाच मुलगा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सुट्टी होती. त्यामुळे विक्रांत मिश्रा हा चुलत भाऊ सुनील जितेंद्र मिश्रासोबत सायकलीने मेहरुण तलावाकडे फिरायला गेला होता. याचठिकाणी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा कार घेऊन शिकण्यासाठी मेहरुण तलावाकाठी गेला होता. हा अल्पवयीन मुलगा जळगाव शहरातील मास्टर कॉलनीतील रहिवासी आहे. तो याठिकाणी आल्यावर याठिकाणी त्याच्या मित्राचीही कार होती. यावेळी दोन्ही मुलांनी कारची शर्यत लावली. त्यात (क्र. एमएच 19 बीयू 6006) रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रांतला जोरदार धडक दिली.
यात विक्रांत हा चेंडूसारखा तब्बल 15 फुट उंच व पुढे फेकला गेला. तसेच त्याची सायकलही बाजुला फेकली गेली. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला जोरदार मार लागल्यामुळे विक्रांतचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे घाबरलेल्या चुलत भाऊ सुनीलने घरी फोन करुन माहिती दिली. दरम्यान, या घटनेनंतर जवळल्या नागरिकांनी धाव घेवून त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. यानंतर त्याच्या आईवडिलांनी आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृतदेह पाहून आई, वडिलांनी एकच हंबरडा फोडला.