टीम इंडिया जिंकल्यावर अफगाणिस्तानच्या फॅननं केलं असं कृत्य, सगळ्यांनाच बसला धक्का!
हार्दिक पंड्यानं खणखणीत षटकार खेचला आणि दहा महिन्यांपूर्वी टी20 विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाची बरोबरी झाली. दुबईतल्या कालच्या सामन्यात पंड्यानं केवळ नाबाद 33 धावाच केल्या नाहीत तर 4 षटकात 25 धावा देत 3 विकेट्सही घेतल्या. या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा बहुमानही मिळाला. पाकिस्तानवर भारतानं मिळालेल्या या विजयाचं सेलिब्रेशन केवळ भारतीय क्रिकेट चाहत्यांनीच नाही तर अफगाणिस्तानच्या फॅन्सनीही साजरा केला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.हार्दिक पंड्यानं विजयी षटकार ठोकताच अफगाणिस्तानमध्ये टीव्हीवर हा सामना पाहणाऱ्या अफगाण चाहत्यानं आनंदाने उड्या मारल्या. टाळ्या वाजवल्या आणि मग त्याने जे केलं ते भन्नाट होतं.या व्हिडिओत हार्दिकनं सिक्स मारल्यानंतर हा चाहता टीव्ही स्क्रीनजवळ पोहोचला आणि स्क्रीनवरच त्यानं पंड्याला किस केलं. अफगाणिस्तानच्या या चाहत्याची स्टाईल सगळ्यांनाच आवडली. हे ट्विट अफगाणिस्तानमधील महिला हक्क कार्यकर्त्या युसुफझाई अनायत यांनी शेअर केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, आमच्या सर्व भारतीय आणि अफगाण बांधवांचे अभिनंदन. भारताचा हा विजय आम्ही साजरा करत आहोत.’
माजी मंत्री अनिल परब यांना मोठा धक्का! ट्विन टॉवरप्रमाणे वादग्रस्त रिसॉर्ट होणार जमीनदोस्त
शिवसेना नेते व माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहे. याबाबत मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी बैठकीनंतर दिली आहे.सी कॉन आणि साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आला आहे. रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पुन्हा राजकीय भूकंप? शिंदे गटातील 15-16 आमदार संपर्कात; शिवसेना नेत्याचा मोठा दावा
एकनाथ शिंदेंसह शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप आला. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळणं आणि शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना अशा अनेक घडामोडी या काळात घडल्या. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा रंगलेल्या असतानाच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे.शिंदे गटातील पंधरा ते सोळा आमदार मातोश्रीच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. ते म्हणाले की, मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये उद्रेकता वाढली आहे. त्यांना असं वाटत आहे की, आपण उगीचच मातोश्री आणि उद्धव साहेबांना सोडलं.
गोकुळच्या सभेला धनंजय महाडिकांची दांडी, पण महाडिक-पाटील गटात राजकीय राडा!
गोकुळची यावर्षीचीही सर्वसाधारण सभा वादळी ठरली. सभासदांच्या हिताच्या प्रश्नापेक्षा ही सभा राजकीय अड्डा बनला, त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपात ही सभा पार पडली. गोकूळ दूध संघाच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने महाडिक आणि सतेज पाटील गट आमने सामने आल्याने गोंधळातच ही सभा पार पडली.
जाहीरपणे सांगूनही खासदार धनंजय महाडिक यांनी सभेला गैरहजेरी लावली मात्र शोमिका महाडिक यांनी या सभेत महाडिक गटाची कमान सांभाळली. महाडिक गटाच्या सभासदांना उशिरा आल्याने बसायला जागा नव्हती, त्यामुळे शोमिका महाडिक यांनी व्यासपीठावर न जाता सभासदमध्येच बसणे पसंत केले. व्यासपीठा खालूनच त्यांनी मायक्रोफोन घेऊन अध्यक्षांना प्रश्न विचारायला सुरवात केली, मात्र त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत अध्यक्षांनी सभा सुरू ठेवली त्यामुळे ठराव मंजूर करण्यावरून दोन्ही बाजूनी गोंधळ उडाला.
फुंक मारताच ‘खेळ खल्लास’; लाइव्ह टीव्ही शोदरम्यान घडली भयंकर दुर्घटना
हल्ली लोक प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करतात. अगदी स्वतःचा जीवही धोक्यात टाकतात. असे किती तरी जीवघेणे स्टंट तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले असतील. असाच धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. एक व्यक्ती एका लाइव्ह टीव्ही शोमध्ये आगीशी स्टंट करत होता. पण त्यानंतर भयंकर दुर्घटना घडली. व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल.
व्हिडीओत पाहू शकता टीव्ही शोमध्ये तीन व्यक्ती स्टेजवर दिसत आहे एका व्यक्तीने दोन लाकूड हातात धरले आहेत, ज्याला कपडा गुंडाळला आहे. एका लाकडीला तो आग लावतो आणि मध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीच्या हातात देतो. ती व्यक्ती त्या लाकडाने दुसरं लाकूडही पेटवते. त्यानंतर एक व्यक्ती स्टेजवर ठेवलेलल्या टेबलच्या कपातून काहीतरी पितो. त्यानंतर ते तोंडात धरतो आणि त्यानंतर दोन्ही पेटलेले लाकूड हातात घेऊन मध्येच उभा राहतो. दोन्ही लाकडं तोंडाच्या वर धरून तो त्यावर फुंक मारतो. त्याचवेळी आग भडकते. आपल्यालाही धडकी भरते.जशी ही व्यक्ती फुंक मारते तशी तिच्या तोंडातही आग लागते आणि अचानक चेहराही पेटतो. त्यानंतर ती व्यक्ती काठ्या खाली फेकून देते ज्यामुळे स्टेजवरही आग लागते. व्यक्ती आपल्या हातांनी चेहऱ्यावरील आग विझवण्याचा प्रयत्न करते. पण आग काही विझत नाही. तशी ती स्टेज सोडून तिथून पळते.तिला पाहून स्टेजवरील इतर व्यक्तींनाही धडकी भरते आणि तेसुद्धा त्या व्यक्तीच्या मागे बॅक स्टेज पळतात.
‘मोरारजी 82व्या वर्षी पंतप्रधान पण मी…’ शरद पवारांचं ते स्वप्न अधूरंच राहणार!
शरद पवारांचं पंतप्रधान व्हायचं स्वप्न अधूरंच राहणार आहे. खुद्द शरद पवारांनीच पंतप्रधान व्हायच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी सध्या 82 वर्षांचा आहे, मोरारजी देसाई देखील 82व्या वर्षी पंतप्रधान झाले होते, पण मी हा कित्ता गिरवणार नाही. मी कोणत्याही प्रकारे सत्तेत सहभागी होणार नाही, तसंच सत्तेची जबाबदारीही घेणार नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
आगामी निवडणुका महाविकासआघाडी म्हणून एकत्र लढावी, असं आमचं मत आहे, पण त्यावर निर्णय झालेला नाही. आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जावं का याची चाचपणी करत आहोत, पण अजूनही निर्णय झालेला नाही. समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवं, असं माझं मत आहे, असंही पवार म्हणाले.
दिवाळीत Reliance देणार गिफ्ट
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने आज (29 ऑगस्ट 2022) 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली. त्यात कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओची 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. येत्या दिवाळीपासून जिओकडून 5G सेवा द्यायला सुरुवात होईल आणि डिसेंबर 2023पर्यंत देशातल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या शहरापर्यंत Reliance Jio 5G सेवेचं जाळं पसरेल, अशी अपेक्षा मुकेश अंबानी यांनी व्यक्त केली. 5G हा यंदाच्या AGM चा मुख्य मुद्दा होता.
75 वर्षांच्या हिलरी क्लिंटन यांचा फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांना पाठिंबा
फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांच्या पार्टीचा व्हिडिओ लीक झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. अशातच काही जण मरिन यांना पाठिंबा देत आहेत. या सुरू असलेल्या गदारोळात अमेरिकेच्या माजी अध्यक्षपदाच्या उमेदवार आणि माजी सेक्रेटरी ऑफ स्टेट हिलरी क्लिंटन यांनी स्वत:चा एक जुना फोटो पोस्ट करून मरिन यांचं समर्थन केलं आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये 2012 मध्ये हिलरी सेक्रेटरी ऑफ स्टेट असताना कोलंबिया दौऱ्यात एका क्लबमध्ये डान्स करताना दिसत आहेत. ‘कीप डान्सिंग’ असं कॅप्शन हिलरी क्लिंटन यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोला दिलंय. या संदर्भात हिंदुस्थान टाईम्सने वृत्त दिलंय.
गंभीर गुन्ह्यातील आरोपी सुटू नये म्हणून केंद्र सरकारचा मोठा निर्णय
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांधीनगर येथील ‘नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी’च्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती लावली. या वेळी एनएफएसयू येथील डीएनए फॉरेन्सिक सेंटर, सायबर सिक्युरिटी सेंटर आणि सेंटर फॉर इन्व्हेस्टिगेशन अँड फॉरेन्सिक सायकॉलॉजीचं उदघाटन त्यांनी केलं. ‘सरकार देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये फॉरेन्सिक तपासणी सुविधा उपलब्ध करून देईल, आणि तपासात स्वातंत्र्य आणि निष्पक्षता राखली जावी, यासाठी कायदेशीर चौकट तयार करेल,’ असं या वेळी अमित शहा यांनी सांगितलं. ‘झी न्यूज’ ने याबाबत वृत्त दिलंय.
काँग्रेस सोडताना गुलाम नबी आझादांचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप करत काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा झाली. या आरोपांविषयी पत्रकारांनी शिवसेना पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला. यावर उद्धव ठाकरेंनी हे मीदेखील भोगतो आहे, असं उत्तर दिलं. ते सोमवारी (२९ ऑगस्ट) मातोश्रीवर पत्रकार परिषदेत बोलत होते.
SD Social Media
9850 60 3590