श्री समर्थ रामदास स्वामी पूजा करीत असलेल्या श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या पंचधातुच्या मूर्ती चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटनेला आठवडा उलटून गेला आहे. तीर्थक्षेत्र जांबसमर्थ घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणी चोरट्यांचा अजूनही काही सुगावा लागलेला नाही. चोरीच्या तपासासंदर्भात आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाईलद्वारे संवाद साधत स्वामी भक्तांना आश्वासन दिलं आहे. शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांनी या प्रकरणी मध्यस्थी करत मोबाईलद्वारे थेट मुख्यमंत्र्यांसोबत भक्तांचं बोलणं करून दिलं.
समर्थ रामदास स्वामी यांचं जनमस्थळ असलेल्या जांब समर्थ येथील श्री राम मंदिरातील काही प्राचीन मूर्ती चोरीच्या घटनेला आठ दिवस उलटून देखील तपासात काहीच हाती लागलेलं नाही. त्यामुळे स्वामी भक्तांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार तथा माजी आरोगयमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह जांब समर्थ गावातील त्या मंदिराला भेट दिली होती.
दरम्यान, काल शिंदे गटातील शिवसेनेचे उपनेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील आज जांब समर्थ येथील त्या मंदिराची पाहणी केली. खोतकर यांनी यावेळी आपल्या मोबाईल वरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गावकऱ्यांचा संवाद साधून दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर या चोरीचा छडा लावून मूर्ती पुन्हा हस्तगत करू आणि दोषींना कठोर शिक्षा करू, असं आश्वासन दिलं.