१८ एप्रिल हा जागतिक वारसा दिन म्हणून पाळला जातो. वारसा म्हणजे पूर्वसुरींकडून मिळालेल्या गोष्टी. मग त्या वास्तू, वस्तू किंवा इतर स्थावर स्वरूपातील मूर्त गोष्टी असतील, किंवा एखादी कला, संस्कार यांसारख्या अमूर्त असतील. हा मिळालेला वारसा जपावा, त्यात आपल्या परीने भर घालावी आणि तो पुढच्या पिढीच्या हाती सोपवावा यासाठी हेरिटेज फाउंडेशन जळगाव ची स्थापना करण्यात आलेली आहे.
आपण, आपले गाव, आपला जिल्हा, आपले राज्य, आपला देश हे सारेच या वारशाच्या परीघात येतात. सध्या जगभरातील 153 देशांमध्ये 936 इतक्या जागतिक वारसा स्थळांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 183 नैसर्गिक स्थळे, 725 सांस्कृतिक, तर 28 स्थळे ही मिश्र स्वरुपाची आहेत. भारतातील 37 पैकी, 27 सांस्कृतिक, 7 नैसिर्गिक आणि 1 मिश्र अशी जागतिक वारसा स्थळे आहेत. केवळ महाराष्ट्र राज्यात अजिंठा, वेरूळसह 5 जागतिक वारसास्थळे आहेत. ही स्थळे शिल्प आणि चित्रसमृद्ध आहेतच. त्याशिवाय ती त्या त्या काळातील विचारशैलीचे, धार्मिक, सामाजिक अभिसरणाचे, समृद्धीचे, विचार प्रवाहांचे प्रतिनिधित्व करतात. वेरूळमधील आधी कळस मग पाया अशा पद्धतीने डोंगरातून खोदले गेलेले कैलास मंदिर हा शिल्पींच्या कलेचा, त्यांच्या ज्ञानाचा मोठा ठेवाच आहे. त्याची अनुभूती घेण्यासाठी आजही जगभरातून लाखो पर्यटक, अभ्यासक तेथे आवर्जून येतात. नुकताच जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा मिळालेले कांचनगंगा अभयारण्य हे भारतातील पहिले मिश्र वारसा स्थळ आहे. माणूस, माणसाचा धर्म आणि निसर्ग, त्याचा स्वतःचा धर्म याची एकतानता येथे दिसते. ती संपूर्ण मनुष्यजातीच्या पुढील वाटचालीसाठी आदर्श आणि महत्त्वाची ठरते. पण आपण व आपल्या परिसरातील किती लोक, शिक्षक व विद्यार्थी या कडे गांभीर्याने पाहतात ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
आपण आत्ता असे का आहोत, याचे उत्तर या परंपरांकडे डोळसपणे पाहिल्यावर समजते. यातील डोळसपणे हा शब्द अधिक महत्त्वाचा. त्या परंपरांमागील कारण शोधायला हवे. ते कारण सापडले, की वारसा जपण्याचे कारण अलगद हाती पडते. हा झाला कला किंवा अमूर्त स्वरूपातील वारसा. मूर्त स्वरूपातील वारसा आपल्याला पूर्वजांचे पराक्रम, त्यांचे विचार, त्यांची जीवनपद्धती, त्यांचे आचरण, वातावरण अशा अनेकविध गोष्टी दाखवत असतो. नालंदा विद्यापीठासारखा वारसा जगाला ज्ञात आहेच पण आपल्याकडे पाटणादेवी हेही असेच विद्यापीठ होते याची माहिती आपल्या नसते. हा वारसा आपल्याला आपल्याच ज्ञानमार्गाची पुन्हा एकदा जाणीव करून देतो. पूर्वजांच्या कर्तृत्वाने अभिमान वाटतो आणि त्याचबरोबर त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून ज्ञानमार्गी होण्याची प्रेरणाही देतो. उत्तम, भव्य ते निर्माण करण्याचा आग्रह हाच वारसा करत असतो. उत्तम गडकोट, रायगडासारखा किल्ला पाहताना मान उंचावते, ऊर भरून येतो, तो उगाच नाही. त्यामागे या साऱ्या गोष्टी असतात. वारसा जपायचा तो यासाठी. आपल्या जगण्याचा आधार समजावा म्हणून आणि त्या आधारे जगण्याला आकार मिळावा म्हणून.
वारसा जपणुकीतून मूर्त स्वरूपाचा फायदा मिळू शकतो का? हो, नक्कीच मिळतो. जळगाव जिल्हा आणि परिसरात वारसा मिरवणारी अनेक दुर्लक्षित स्थळे आहेत. जुनी मंदिरे, बारवा, वीरगळ व इतर अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत. त्याच प्रमाणे आपल्या राज्यात व देशभरातही अनेक ठिकाणी त्यांचे महत्त्व माहीत नसल्यामुळे एकतर ती फक्त धार्मिक स्थळे होतात किंवा अचानक त्यांचा जीर्णोद्धार होऊन पुरातन कला, विचारांच्या जागी सिमेंट काँक्रिटची नवी वास्तू उभी राहते. त्या ऐवजी त्या वास्तूचे तसेच जतन केले, त्या विषयातील तज्ज्ञांना बोलावून त्याची माहिती घेतली, माहिती फलक उभे केले, तज्ज्ञांच्या साहाय्याने गावातील तरुणांना माहिती देण्यास तयार केले, पर्यटकांनासाठी स्वच्छतागृहे, अल्पोपहाराची व्यवस्था केली आणि या साऱ्या गोष्टी, त्या वास्तूचे महत्त्व, प्राचीनता लोकांपर्यंत पोहोचवली, तर त्या गावातील पर्यटन निश्चितपणे वाढेल. त्याचा आर्थिक दृष्टीने सकारात्मक परिणाम होईल.
या साऱ्या गोष्टी गृहित धरल्या, वारसा जपणुकीमागील सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक गोष्टींचा विचार केला, तरी यातून साध्य काय होणार, हा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहतो. पुन्हा एकदा उत्तर तेच येते, आपल्या जगण्याचा, वागण्याचा आधार सापडतो. आपल्याला आपली चिकित्सा करता येते. इतिहासाचा आधार घेऊन वर्तमानाच्या खांद्यावर उभे राहिले, की भविष्याचा अधिक स्पष्टतेने विचार करता येतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, जगात कोठेही, काहीही झाले, की आमच्याकडे हे होतेच, असे आपण वारंवार म्हणत असतो किंवा ऐकत असतो. मग आपल्याकडे नक्की काय होते, ते शोधायला नको का? जे आहे त्याचे संवर्धन करायला नको का? आणि असलेला वारसा साऱ्या जगाला अभिमानाने दाखवायला नको का? हे सारे करून ते पुढच्या पिढीच्या हाती सुपूर्दही करायला हवे आणि मिळालेला वारसा सांभाळण्यासाठी ती पिढी सुशिक्षितही करायला हवी.
याच सर्व विचारातून हेरीटेज फाउंडेशन जळगावचे संस्थापक संचालक भुजंग बोबडे यांनी या विषयावरील राष्ट्रीय, आंतर-राष्ट्रीय पातळीवरील तज्ञांच्या मदतीने जुलै 2020 पासून 32 विविध प्रकारच्या कोर्सेसचे आयोजन केले. ज्यात संग्रहालय वारसा, संग्रहालय व्यवस्थापन, भारतातील जागतिक वारसा स्थळे, भारतीय कला व स्थापत्याचा वारसा, नृत्य व संगीताचा वारसा – कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी इ., सुंदर अक्षरलेखन शैली, मोडी लिपि, जपानी भाषा, ऐतिहासिक वारसा स्थळांचे व्यवस्थापन, भारतीय लोककलांचा वारसा असे विषय निवडण्यात आले.
प्रसिद्ध नृत्यांगना गुरु शमा भाटे, निलिमा हिरवे, डॉ. स्वाति दैठणकर, रसिका गुमास्ते यांच्यासह संगीत अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे, हस्ताक्षर शैली तज्ञ श्रुती चुट्टार, अहमदाबाद येथील हनोज पटेल, जबलपुरच्या डॉ. मेधा दुबे, बेंगलोर येथील आर्किटेक्ट प्रा. सिंधु जगन्नाथ, दिल्ली विद्यापीठाच्या प्रा. डॉ. सारंगा बात्रा या भारतीय विद्वानांसह अमेरिकेतील डॉ. जुडी फ्रेटर, फ्रान्स मधील डॉ. मॅथु स्क्लप्टर इ. ज्येष्ठ संशोधकांनी व्याख्याते म्हणून मार्गदर्शन केले.
आत्तापर्यंत यात इंडियन हेरीटेज या यू ट्यूब चॅनलवर 42 देशातील 78900 लोकांनी 12500 तास ,इंडियन हेरीटेज या ब्लॉगवर 11 देशातील 9600 लोकांनी 4300 तास ,गुगल मिटवर 9 देशातील 11700 लोकांनी 3400 तास असे एकूण 60 देशातील 1 लाख विद्यार्थी व नागरीक यात सहभागी झाले व सर्वांनी मिळून 20 हजार तास भारतीय ऐतिहासिक वारसा अध्ययनासाठी दिले.
या कोर्सेस साठी वयाचे व पूर्व शिक्षणाचे कोणतेही बंधन नव्हते त्यामुळे अगदी वयाच्या 7 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंतच्या सर्वांनीच याचा आनंद घेतला.
भुजंगराव बोबडे,जळगाव