आज दि. १७ एप्रिल २०२१ च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा

sdnewsonline मध्ये आपण सर्वांचे स्वागत….!

नमस्कार

मुख्यमंत्र्यांनी निर्लज्ज राजकारणाचा
रोजचा डोस थांबवावा : पियुष गोयल

एकीकडे महाराष्ट्रात आणि देशभरात देखील कोरोनाचे रुग्ण आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू यामध्ये मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. नागरिक चिंताग्रस्त झाले असून त्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्या तुटवड्याची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून लस तुटवड्यानंतर या गोष्टींच्या तुटवड्यावर आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. त्यात आता थेट केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी परखड शब्दांमध्ये महाराष्ट्र सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी”, असं ट्वीट पियुष गोयल यांनी केलं आहे..

तिसरी लाट आल्यास
उद्योगांनी तयारी ठेवावी

कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून, तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे .

निरव मोदीला हस्तांतरित करण्याची
इंग्लंडच्या गृह मंत्रालयाची तयारी

आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या हस्तांतरणाला इंग्लंडच्या गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे. सीबीआयनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. UK मधल्या न्यायालयानं नीरव मोदीच्या हस्तांतरणाची भारताची मागणी योग्य असल्याचा निर्वाळा फेब्रुवारीतच दिला होता. त्यामुळे नीरव मोदी लवकरच भारताच्या ‘होणार आहे. मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून (पीएनबी) तब्बल २ अब्ज डॉलर्सची फसवणूक मोदी याने केली आहे. मोदी हा हिरे व्यापारी आहे. याप्रकरणात तो भारताला हवा आहे. त्याविरुद्ध तसा गुन्हे दाखल आहेत. त्याची भारतातील मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे.

रेमेडिसीवीर इंजेक्शनचे
850 डोस चोरी

रेमेडिसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असताना आता या इंजेक्शनची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भोपाळमधील एका सरकारी रुग्णालयातून रेमेडिसीवीर इंजेक्शनचे तब्बल 850 डोस चोरी गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना रुग्णांना बेड्स उपलब्ध नाहीत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे.

चारा घोटाळ्याप्रकरणी
लालू प्रसाद यांना जामीन

चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांना जामीन मिळाला आहे. गेल्या वर्षभरापासून ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. जामीन मिळाल्याने आता तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहेत. त्यासोबत त्यांना १० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर काही शर्थी अटी ठेवण्यात आल्या आहेत. मंजुरीविना त्यांना देशबाहेर जाता येणार नाही. तसेच आपल्या घरचा पत्ता आणि मोबाईल नंबर बदलण्यास मनाई करण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव यांच्यावर सध्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत

बेड मिळत नसल्यानं कोरोनाबाधित
महिलेची आत्महत्या

राज्यातील महानगरे आणि प्रत्येक जिल्ह्यातील चित्र आता जळपास एकसारखंच दिसू लागलं आहे. कोरोनामुळे रुग्णांच्या मनात मृत्यूची भीती घर करत असून, नातेवाईकांना बेडसाठी धावपळ करावी लागत आहे. मात्र, तरीही अनेकांना बेड मिळत नसल्याचं दिसत आहे. हे ढळढळीत वास्तव समोर आणणारी खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. बेड मिळत नसल्यानं एका कोरोनाबाधित महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनं पुण्यातील आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती चव्हाट्यावर आली आहे.

ऑक्सिजनचा तुटवडा; मुख्यमंत्र्यांनी केला
पंतप्रधानांना तीन वेळा फोन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या २४ तासामध्ये तिनदा फोन केल्याचे वृत्त समोर आले आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती आणि ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा हे त्यामागचे मुख्य कारण आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून विविध प्रकारच्या मागण्या केल्या होत्या. त्यात ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी मुख्य होती. कोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती जाहिर करावी आणि ऑक्सिजनचा पुरवठा हवाई मार्गाने करावा, असे त्यात प्रामुख्याने म्हटले होते. राज्याला १२०० ते १५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा त्वरित सुरळीत व्हावा, अशी मागणी ठाकरे यांनी मोदींकडे फोनद्वारे केली आहे. त्यामुळे मोदी आता काय निर्णय घेतात आणि केंद्र कशी व्यवस्था करते, याकडे लक्ष लागले आहे.

सेल्फीच्या नादात
६ जणांचा मृत्यू

सेल्फी काढण्याच्या नांदात वालवादेवी धरणात ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी पाच मुली व एक मुलगा असे सहा मित्र मैत्रिणी गेले होते. दरम्यान सेल्फी काढण्याच्या नांदात या ६ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाथर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कौटुंबिक वादात पासपोर्ट रद्द
केला जाऊ शकत नाही

कौटुंबिक वादात एखाद्या व्यक्तिला त्याची बाजू जाणून घेण्याची संधी दिल्याशिवाय पासपोर्ट रद्द केला जाऊ शकत नाही. पासपोर्ट रद्द करणे हा कठोर निर्णय आहे. संबंधित व्यक्तिची बाजू ऐकल्याशिवाय असा निर्णय दिला जाऊ नये, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. कौटुंबिक वादामुळे एका व्यक्तिचा गेल्यावर्षी मे मध्ये पासपोर्ट रद्द केला होता. संबंधित व्यक्तिने सरकारचा हा निर्णय रद्द करण्याची मागणी करत याचिका दाखल केली. याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश प्रतिभा एम. सिंह यांनी वरील टिप्पणी केली आहे.

दहा हजार आरोग्य कर्मचारी
पदांची तातडीने भरती

राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला पद भरती बाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार 127 पदे तातडीने तातडीने भरण्याची मागणी केली आहे. राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला पद भरती बाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार 127 पदे तातडीने तातडीने भरण्याची मागणी केली आहे.

कुंभमेळा प्रतीकात्मक
करा : पंतप्रधान

हरिद्वारमधील कुंभ मेळ्यात शेकडो साधू-संतांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यावरुन आता पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन, साधूंना आवाहन केलं. मोदी म्हणाले, “आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरुन बोलणं झालं. सर्व संतांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सर्व संत प्रशासनाला सहकार्य करत आहेत. त्यासाठी मी संत जगताचं आभार व्यक्त केलं.

जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्याची
विद्यार्थ्यांकडून मागणी

देशातील इतर बोर्डांच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा 27 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणार आहे. जेईई मेनच्या विद्यार्थ्यांकडून आता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. विद्यार्थी #POSTPONEJEEMains2021 ही मोहीम राबवत आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांच्याकडे विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.

भक्ती वाघिणीच्या दुसऱ्या
बछड्याचाही मृत्यू

भक्ती वाघिणीचाच पाय पडून तिच्या एका बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना दुसऱ्या बछड्यानेही जगाचा निरोप घेतला. आईची माया न मिळाल्याने दुसऱ्याही बछड्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. गेल्या आठवड्यात जन्मलेल्या दोन बछड्यांपैकी एकाचा अवघ्या चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयात ही घटना घडली.

चलनी नोटांची
छपाई सध्या बंद

कोरोना विषाणूचा वाढता आलेख लक्षात घेता नाशिक येथील करन्सी सिक्युरीटी प्रेस आणि इंडीया सिक्युरिटी प्रेस या दोन्ही ठिकाणी होणारी चलनी नोटांची छपाई सध्या बंद करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी केवळ फायर ब्रिगेड, पाणीपुरवठा तसेच वैद्यकीय सुविधा या प्रकारातील कर्मचारी कामावर येत आहेत.

SD Social Media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.