कोळशामुळे ‘आनंदवन’वर जप्तीची कारवाई शक्य!; डॉ. विकास आमटे यांची चिंता

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी महारोग्यांच्या सेवेसाठी ‘आनंदवन’ची स्थापना केली. आनंदवनात आतापर्यंत ११ लाख कुष्ठरुग्णांवर उपचार करण्यात आले. देशात ११९ कायदे कुष्ठरुग्णांच्या विरोधात आहेत. आनंदवन व सोमनाथ प्रकल्प जेथे उभे आहेत, त्या जमिनीखाली मोठय़ा प्रमाणात कोळशाचा साठा आहे. यामुळे आनंदवनवर कधीही जप्तीची कारवाई होऊ शकते, अशी भीती डॉ. विकास बाबा आमटे यांनी व्यक्त केली.

आनंदवन मित्र मंडळ, महाराष्ट्र व डॉ. विकास बाबा आमटे अमृत महोत्सव सत्कार समितीच्या वतीने महारोगी सेवा समिती, वरोरा व आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार मुख्यमंत्री सभागृहात पार पडला. सत्काराला उत्तर देताना डॉ. विकास आमटे बोलत होते. या वेळी मंचावर निवृत्त न्यायमूर्ती डॉ. विकास सिरपूरकर, डॉ. भारती आमटे, डॉ. प्रकाश बाबा आमटे, डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे, नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, दगडू लोमटे, नरेंद्र मेस्त्री उपस्थित होते.

अमृतमहोत्सवी सत्काराला उत्तर देताना डॉ. विकास आमटे यांनी बाबा आमटे व आनंदवनचा संपूर्ण जीवनपट उलगडला. आनंदवनात २६ देशांतील लोक तीन महिने वास्तव्य करायचे, बाबा आमटेंच्या हातातून सेवेचा सुगंध यायचा. मात्र, आनंदवन जगातील सर्वात वाईट ठिकाण आहे, असे बाबा सातत्याने म्हणायचे. त्याचे कारण, येथे समाजातील वाळीत टाकलेल्या लोकांचे वास्तव्य. कुष्ठरुग्णांना रक्त घेता येत नाही, रक्त देता येत नाही, सोडचिठ्ठी तत्काळ मिळते. सव्वा कोटी कुष्ठरुग्णांना आधार कार्ड नाही. आनंदवन बाहेरून चांगले दिसत असले तरी कुष्ठरुग्णांचे दु:ख आम्हीच जाणतो. दु:खाला जात-पात, धर्म नाही. आनंदवन, बाबा आमटे यांच्यावर ‘ढोंगी’ म्हणून टीका झाली. मात्र, देश व जागतिक स्तरावर कौतुकही झाले, असे डॉ. विकास आमटे यांनी सांगितले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. विकास आमटे गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.