९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक आज मंगळवारी वर्धा येथे पार पाडली. या बैठकीत ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व वैचारिक लेखनासाठी प्रसिद्ध असलेले नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली.विदर्भ साहित्य संघाचे या वर्षी शताब्दी वर्ष असल्यामुळे ९६ वे संमेलन विदर्भात व्हावे, अशी इच्छा महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने व्यक्त केली होती. त्या संमेलनासाठी त्यांनी वर्धा हे नाव संमेलनस्थळासाठी सुचवले होते. साहित्य महामंडळानेही त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत हे संमेलन वर्धेला दिले.
दहावर्षानंतर होणार आज चंद्रग्रहण
आज संध्याकाळी वर्षातील सर्वात शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. संपूर्ण चंद्रग्रहण देशाच्या पूर्व भागात आणि उर्वरित शहरांमध्ये आंशिक चंद्रग्रहण दिसेल. पुढील वर्षी 2023 मध्ये एकूण चार ग्रहण होतील. दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होतील, परंतु देशात फक्त एकच आंशिक चंद्रग्रहण दिसणार आहे. तर, आज चंद्रग्रहण पाहण्याची संधी गमावू नका. हे ग्रहण चंद्रोदयानंतरच दिसणार आहे. चंद्रग्रहण इटानगरमध्ये संध्याकाळी 4.23, दिल्लीत 5.28 आणि मुंबईत 6.01 वाजता सुरू होईल जे संध्याकाळी 6.19 पर्यंत राहील.
ग्रहणाचे सुतक सुरू, मंदिरात पूजा होणार नाही.
G-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताने लिंगसमानतेला महत्त्व द्यावे – ‘यूएन विमेन’ची अपेक्षा
भारत पुढील महिन्यात जी-२० राष्ट्रगटाचा अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेणार असून, अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत लिंगसमानतेचा मुद्दा आपल्या अजेंडाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न करेल, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्यक महासचिव तसेच ‘यूएन विमेन’च्या कार्यकारी उपसंचालक अनिता भाटिया यांनी व्यक्त केली आहे. ‘यूएन विमेन’ हा संयुक्त राष्ट्रांमध्ये स्त्रियांच्या प्रश्नावर काम करणारा विभाग आहे.यूएन विमेन भारतात करत असलेल्या कामाबद्दल ‘इकनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अनिता भाटीया यांनी सांगितले, ‘आम्ही भारतातील महिला व बालविकास मंत्रालयासोबत काम करत आहोत आणि आता भारत जी-२० राष्ट्रसमूहाचा अध्यक्ष होणार असल्यामुळे भारताच्या कार्यकाळात जी-२०च्या अजेंडावर लिंगसमानता केंद्रस्थानी आणली जावी अशी अपेक्षा आहे.
अब्दुल सत्तारांचं वादग्रस्त वक्तव्य, मग माफी
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केली. तसंच अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याबाबत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली. तसंच एकनाथ शिंदेंनी सत्तार यांना माफी मागण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अब्दुल सत्तार यांनी जाहीर माफी मागितली. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. या सगळ्या वादावर काल दिवसभर शांत असलेल्या सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी या सगळ्या वादावर काही ट्वीट केली आहेत.
लॉकडाऊनची झळ पुन्हा अनुभवता येणार; ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या कामाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई लवकरच आणखी एका हिंदी चित्रपटात दिसणार आहे. ‘इंडिया लॉकडाऊन’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट कोरोना महामारीच्या वेळी देशातील बिकट परिस्थितीच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटाचा टीझर खूपच भयावह आहे ज्यामध्ये लॉकडाऊन काळातील सत्य परिस्थिती दर्शवली आहे.
सई ताम्हणकरने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. टीझरच्या सुरुवातीलाच भारत सरकारने 21 दिवसांसाठी देशव्यापी लॉकडाउन लागू केल्याचे सांगितले जात आहे. टीझरच्या दुसर्या भागात लॉकडाऊनमुळे इतर शहरांमध्ये अडकलेले स्थलांतरित मजूर आणि आपला उदरनिर्वाहासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. कोरोना महामारीच्या काळात झालेल्या सर्व जखमा या टीझरने ताज्या केल्या आहेत.
टीम इंडियाला फायनलमध्ये घेऊन जाणार हा बॉलर? प्रत्येक 11 बॉलनंतर घेतोय विकेट
गुरुवारी भारत आणि इंग्लंड संघात टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलचा मुकाबला रंगणार आहे. टीम इंडिया आता टी20 वर्ल्ड कप ट्रॉफीपासून अवघे 2 पावलं दूर आहे. त्यामुळे रोहित शर्मा अँड कंपनी इंग्लंडला हरवून दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकण्याचा निर्धारानं मैदानात उतरेल. रोहितला या वर्ल्ड कपमध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगलीच साथ दिली आहे. त्यात टीम इंडियाचा एक गोलंदाज चांगलाच फॉर्मात आहे. यंदाच्या सीझनमध्ये त्यानं भारताकडून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. तोच बॉलर भारताला फायनलमध्ये घेऊन जाण्यासाठी सज्ज झाला आहे. त्या बॉलरचं नाव आहे अर्शदीप सिंग. अर्शदीप सिंगनं सुपर 12 फेरीत आतापर्यंत 5 मॅचमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत. सध्या वर्ल्ड कपमधल्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी तो एक आहे. त्यामुळे सेमी फायनलमध्ये अर्शदीपच्या कामगिरीवर सर्वांची नजर राहील. या स्पर्धेत अर्शदीपचा स्ट्राईक रेट भन्नाट आहे. त्यानं दर 11 बॉलमागे 1 विकेट घेतली आहे. आतापर्यंत अर्शदीपनं वर्ल्ड कपमध्ये 18 ओव्हर टाकल्या आहेत. त्यात त्यानं 7.83 च्या इकॉनॉमीनं 141 रन दिले आहेत. भारताकडून अर्शदीपनंतर हार्दिक पंड्या सर्वात जास्त विकेट घेणारा दुसरा बॉलर आहे.
सत्तारांच्या विधानावरून भाजप-शिंदे गटात नाराजी, बावनकुळे स्पष्टच बोलले
राज्याचे कृषी मंत्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सत्तार यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान यावर राष्ट्रवादीकडून सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा निषेध करत सत्तार यांना सुनावले आहे. याचबरोबर त्यांनी याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार ही केली आहे. या सगळ्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. दरम्यान सत्तार यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातारवण ढवळून निघाले आहे.
सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध करत बावनकुळे म्हणाले की, या सगळ्या घटनेवर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मुख्यमंत्री घेतील यावर आम्हाला बोलायचा अधिकार नाही. युती सरकारमध्ये मंत्र्यांनी अशी वक्तव्ये न करण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये काही नेत्यांनी महिल्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे आमच्याकडे दाखले आहेत. परंतु यावर वाद घालणे टाळावे. तसेच संजय राऊत यांनीही महिलांवर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते हे विसरून चालणार नसल्याचे म्हणत सर्वांनी राजकीय शिष्टाचार पाळला पाहिजे अन्यथा राजकीय वातावरण बिघडू शकते असे बावनकुळे म्हणाले.
नापास झाल्यानंतर मिळणार आणखी एक संधी, हजारो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
नोकरी मिळाली नाही तर स्वयंरोजगाराची हमखास संधी म्हणून ओळख असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची धाव असली तरी अनेक विद्यार्थी दरवर्षी नापास होतात. मात्र, कोरोनात दोन वर्षे गेली, अशा विद्यार्थ्यांना शेवटची संधी म्हणून पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. वर्धा जिल्ह्यातील नापास झालेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. आयटीआय पास होण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नवी दिल्लीतील प्रशिक्षण महासंचालनालयामार्फत अखिल भारतीय व्यवसाय सत्र व वार्षिक पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 2014 ते 2019 या प्रवेश सत्रात प्रवेश घेतलेल्या परंतु परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे.
दनुष्का गुणतिलका सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित, बलात्काराच्या आरोपानंतर श्रीलंकन बोर्डाची कारवाई
श्रीलंकेचा सलामीवीर दनुष्का गुणतिलकावर ऑस्ट्रेलियात बलात्काराचा आरोप झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेटने कारवाई केली आहे. क्रिकेट बोर्डाने त्याला निलंबित केले आहे. म्हणजेच यापुढे बलात्कार प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळता येणार नाही. शनिवारी श्रीलंकाने इंग्लंडिविरोधात आपला शेवटचा सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बलात्काराच्या आरोपाखाली दनुष्का गुणतिलका याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, श्रीलंका संघ त्याच्याशिवाय मायदेशी रवाना झाला आहे.
BCCI च्या अध्यक्षांसहीत जय शाह फायनल्स पाहायला ऑस्ट्रेलियाला जाणार; उपांत्य फेरीआधीच निर्णय
ऑस्ट्रेलियातील टी २० विश्वचषक २०२२ आता अंतिम टप्प्यात आला असून भारतीय चाहत्यांसह जगभरातील प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे की यावेळेस टी२० विश्वचषकाचा बादशाह कोण होणार आहे. १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आयसीसी निवडणुकांव्यतिरिक्त आयसीसीच्या वार्षिक बैठकीसाठी मेलबर्नमध्ये हजर असतील. बैठकीनंतर, सर्व बोर्ड अधिकारी अंतिम सामना पाहतील. अंतिम सामन्यादरम्यान बीसीसीआयचे अधिकारी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या सहकाऱ्यांना भेटतील. पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा अंतिम फेरीचा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहतील अशी माहिती समोर आली आहे. टी२० विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना ९ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. तसेच, दुसरा उपांत्य सामना १० नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध इंग्लंड संघात खेळला जाईल. या सामन्यांमध्ये जो संघ विजयी होईल, त्यांच्यात अंतिम सामना खेळला जाईल.
SD Social Media
9850 60 3590