इलॉन मस्क झाले
ट्विटर चे मालक
टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी असलेल्या ट्विटरची १०० टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी दिलेला प्रस्ताव कंपनी स्वीकारण्याच्या तयारीत आहे. मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रतिसमभागाप्रमाणे ट्विटरचे १०० टक्के समभाग सुमारे ४३.३९ अब्ज डॉलरला रोखीत खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. अखेर वाटाघाटीनंतर हा सौदा ४४ अब्ज डॉलरला निश्चित करण्यात आल्याचं रॉयर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलंय. यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मात्र हा सौदा निश्चित झाल्याचं मस्क यांनी केलेल्या ट्विटवरुन दिसत आहे
पोलीस आयुक्तांनी खोडले
नवनीत राणांचे आरोप
राणा दांपत्याचा व्हिडीओ मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट केला असून यामध्ये खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा पोलीस ठाण्यात बसून चहा पित असल्याचं दिसत आहे. नवनीत राणा यांनी एकीकडे पोलिसांनी पाणीदेखील दिलं नसल्याचा आरोप केला असताना संजय पांडे यांनी या व्हिडीओतून त्यांचे सर्व आरोप खोडून काढले आहेत.
अमोल मिटकरी राष्ट्रवादीच्या तमाशामधील
फडावरचा नाच्या : सदाभाऊ खोत
अमोल मिटकरी राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे अशी आक्षेपार्ह टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरींचं फार गांभीर्याने घ्यावं असं मला वाटत नाही म्हटलं. जातीभेद, जातीयवाद वाढावा, तोडा फोडा अशी राष्ट्रवादीची जुनी नीती आहे असा आरोपही यावेळी त्यांनी केला. यावेळी त्यांनी शरद पवारांवर काही गंभीर आरोप केले.
६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी
कोवॅक्सिनच्या वापरास परवानगी
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) आज ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या मर्यादित वापरास परवानगी दिली आहे. याचबरोबर DCGI ने लस उत्पादकास पहिल्या दोन महिन्यांसाठी दर १५ दिवसांनी योग्य विश्लेषणासह प्रतिकूल घटनांच्या माहितीसह सुरक्षितता डेटा सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत.
१ ते १५ जुलैदरम्यान विद्यापीठांकडून
परीक्षा घेतल्या जाणार
राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यावर ठाम आहेत. १ ते १५ जुलैदरम्यान विद्यापीठांकडून परीक्षा घेतल्या जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी विद्यापीठांकडून करण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षेची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली.
एबीजी शिपयार्डच्या
२६ ठिकाणी छापे
देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा एबीजी शिपयार्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने पुन्हा छापेमारी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज मुंबई, पुणे आणि सुरतमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. आतापर्यंत या छापेमारी संदर्भात फारशी माहिती समोर आलेली नाही. हा घोटाळा २२ हजार कोटींहून अधिक रुपयांचा असल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे आणि सुरतसह २६ ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.
महागाई नियंत्रणासाठी मध्यवर्ती
बँकेला व्याजदर दर वाढवावे लागतील
भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले की, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मध्यवर्ती बँकेला व्याजदर दर वाढवावे लागतील आणि या दरवाढीकडे राजकारणी आणि नोकरदारांनी “देशविरोधी” पाऊल म्हणून पाहू नये. आपल्या परखड मतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजन यांच्या मते, ‘महागाई विरोधातील लढाई’ कधीच संपत नाही, हे लक्षात ठेवायला हवे.
राज ठाकरेंनी बाह्या सरसावल्या, औरंगाबादच्या सभेआधी मनसे अध्यक्षांचा मोठा निर्णय
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरली भोंगे खाली करण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे या घडामोडींचा सामाजिक जीवनावरही काहीसा परिणाम होताना दिसत आहे. कारण औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची 1 मे रोजी सभा असणार आहे. पण त्याआधीच पोलिसांनी शस्त्रबंदी लागू केली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगीदेखील दिलेली नाही. पण तरीही मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या सभेसाठी ठाम आहेत. मनसेकडून औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर सभेची जोरदार तयारी सुरु आहे. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना राज ठाकरे यांनी पक्ष बांधनीसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे औरंगाबादच्या सभेआधी दोन दिवसांचा पुणे दौरा करणार आहेत. राज ठाकरे 29 आणि 30 एप्रिल रोजी पुण्यात असणार आहेत. त्यानंतर 1 मे रोजीच्या औरंगाबादच्या सभेसाठी ते पुण्यातून जाणार आहेत.
युक्रेनच्या हवाई हल्ल्यात रशियाच्या ऑईल डेपोला आग, भारताला इंधन तुटवडा जाणवणार का?
रशिया-युक्रेन युद्धाला 2 महिन्यांहून अधिक कालावधी होत आहे. परंतु, युद्ध संपण्याऐवजी वाढतच आहे. दरम्यान, सोमवारी युक्रेनने रशियाच्या ब्रियांस्क शहरावर हल्ला केला. युक्रेनच्या सैन्यानं क्षेपणास्त्रं डागून एक तेल डेपो नष्ट केला आहे. आगीचे लोट आणि धुराचे लोट पाहून आगीची तीव्रता लक्षात येते. स्फोटानंतर उसळलेल्या ज्वाला ज्वालामुखीसारख्या दिसत आहेत. रशियाच्या ऊर्जा मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलंय की, सोमवारच्या आगीत ब्रियान्स्कमधील डिझेल इंधन डेपोचं नुकसान झालं आहे. अधिकारी या घटनेच्या परिणामांचा शोध घेत आहेत. देशाच्या पश्चिम भागात असलेल्या तेल डेपोला लागलेल्या भीषण आगीमुळे इंधनाचा तुटवडा भासणार नाही, असं ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे.
मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत
घेतल्यानंतर अमेरिकन सरकार चिंतेत
मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेतल्यानंतर व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या जेन पास्की यांनी, “यासंदर्भातील आमच्या चिंता काही नव्या नाहीत. राष्ट्राध्यक्षांनी यापूर्वीही अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसच्या वापरासंदर्भात चिंता व्यक्त केली असून त्यामध्ये त्यांनी ट्विटरसहीत इतर माध्यमांचा चुकीची माहिती पसरवण्यासाठी वापर होऊ शकतो असं म्हटलेलं,” अशी प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळेच या अब्जावधीच्या व्यवहारामुळे सोशल मीडियाबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या बायडेन यांची चिंता वाढल्याचं म्हटलं जातंय.
कॅप्टन कूल धोनीची पत्नी लोडशेडिंगमुळे संतापली, राज्य सरकारला दिला ‘करंट’
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा त्याच्या शांत स्वभावामुळे कायमच ओळखला जातो. कॅप्टन कूल म्हणून नाव मिळवलेल्या धोनीची पत्नी मात्र सततच्या लोडशेडिंगमुळे चांगलीच भडकली आहे. एवढच नाही तर तिने झारखंडच्या सरकारवरही निशाणा साधला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच सध्या देशाच्या बऱ्याच राज्यांमध्ये वीज टंचाईचं संकट ओढावलं आहे, झारखंडही याला अपवाद नाही.झारखंडमध्ये गेली कित्येक वर्ष वीज टंचाई का आहे? हे मला करदाती म्हणून जाणून घ्यायचं आहे. वीज बचत करून आम्ही जबाबदारी पार पाडत आहोत, असं ट्वीट साक्षीने केलं आहे.
पुण्यात दाखल गुन्ह्यात
सदावर्ते यांना जामीन
मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते यांना आज उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पुण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सदावर्तेंवर २०२० मध्ये दाखल गुन्ह्याप्रकरणी ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी अर्ज देखील केला आहे.
रोहित शर्मा सोडणार मुंबईची कॅप्टन्सी? त्या ट्वीटमुळे वाढला संभ्रम
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. पाच वेळची चॅम्पियन रोहित शर्माच्या टीमने या हंगामात सगळ्या 8 मॅच गमावल्या आहेत, त्यामुळे टीम पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच 10 व्या क्रमांकावर आहे. या खराब कामगिरीनंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडेल, असं बोललं जात आहे. आठव्या पराभवानंतर रोहित शर्माने एक इमोशनल ट्वीट केलं, त्यामुळे या चर्चा आणखी जास्त सुरू झाल्या आहेत. ‘आम्ही या मोसमात सर्वोत्तम कामगिरी केली नाही, पण असं होतं. अनेक दिग्गज अशा काळातून गेले आहेत. मी या टीमवर आणि इथल्या वातावरणावर प्रेम करतो. या टीमबद्दल विश्वास आणि निष्ठा दाखवणाऱ्या चाहत्यांचंही मला कौतुक आहे,’ असं रोहित शर्मा त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला आहे. या ट्वीटमध्ये त्याने मुंबई इंडियन्सनाही टॅग केलं आहे.
SD social media
9850 60 35 90