भारतीय नौदलाची ताकद वाढण्यात येणार आहे. त्यादृष्टीने केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. नौदलाची ताकद वाढण्यासाठी 6 अत्याधुनिक पाणबुड्या बांधण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल 50 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकल्प रखडला होता. आता त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारतीय नौदलासाठी बांधण्यात येणाऱ्या या पाणबुड्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या असणार आहे. या 6 अत्याधुनिक पाणबुड्यांची निर्मिती मुंबईतील माझगाव डॉकवर केली जाणार आहे. पाणबुडीच्या निर्मितीचे हे काम माझगाव डॉक लिमिटेड आणि एल अँण्ड टी कंपनीला देण्यात आले आहे.
‘प्रोजेक्ट 75- इंडिया’ अंतर्गत या 6 पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नौदलासाठी या पाणबुड्या निर्मिती करण्यासाठी तब्बल 50 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
समुद्री ताकद वाढविण्यासाठी भारतीय नौदलाने 75-I हा प्रकल्प हाती घेतला आहे. यात 6 पाणबुड्यांच्या निर्मिती केली जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे यांचा आकार सध्याच्या स्कॉर्पिअन क्लास पाणबुडीपेक्षाही पाच पटीने मोठा असेल. तर या पाणबुड्या डिझेल आणि इलेक्ट्रीक असणार आहेत.
भारताकडे सध्या एकूण 140 युद्धनौका आणि पाणबुड्या आहेत. तर पाकिस्तानकडे फक्त 20 युद्धनौका आणि पाणबुड्या आहेत. मात्र चीनचा वाढता धोका लक्षात घेता भारताला संरक्षण भर द्यावा लागणार आहे. तसेच समुद्र क्षेत्रात अधिक शक्तिशाली होण्याची गरज असल्याने आगामी काळात नौदलाची ताकद वाढविण्याची योजना भारताने केली आहे.