राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. ठिकठिकाणी नदी नाले तुटुंब भरून वाहत आहे. कोकणामध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. यामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आज पहाटे पाचच्या सुमारास अनुस्कुरा घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे रत्नागिरीवरून राजापूर- कोल्हापूर मार्गे पुण्याला जाणारी एसटी घाटात अडकल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दुचाकी काही प्रमाणात पास होत असल्यामुळे मोठ्या गाड्या मात्र घाटात अडकल्या असल्याचे समजते त्यामुळे वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे. घाटामध्ये वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
दरड कोसळण्याची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या कर्मयाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कोसळलेल्या दरडीचा भाग हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातला परशुराम घाट दरड कोसळत असल्याने अत्यंत धोकादायक बनला असल्याने गेल्या महिनाभरापासून या घाटातील वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. मात्र हा घाट धोकादायक बनल्याने याचा सर्वाधिक मोठा फटका बसला आहे तो या घाट माथ्यावरील परशुराम आणि घाटाच्या अगदी पायथ्याशी असलेल्या पेढे परशुराम या दोन गावांना. या दोन्ही गावांमधील ७० हुन अधिक कुटुंबियांना मोठा धोका असल्याने तात्काळ पुनर्वसन होण्याच्या नोटीस देण्यात आल्यात तर घाट आणि या भागातल्या दोन शाळा बंद असल्याने तब्बल ९०० विद्यार्थी गेल्या १५ दिवसांपासून घरीच आहेत. भीतीपोटी येथील ग्रामस्थ गेल्या १५ दिवसांपासून एकही रात्र झोपले नाहीत. त्यामुळे परशुरामाचे पदस्पर्शाने पावन असलेले हे गाव रामभरोसे झाल्याचे बोलले जात आहे.