शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मी यापुढे बोलणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. ते म्हणाले, आज बाळासाहेब ठाकरे असते तर माझ्या वाघाने महाराष्ट्र जिंकला म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर टिळा लावला असता. ते म्हणाले, माझ्यासाठी गुरूस्थानी असलेल्या शरदचंद्र पवार यांच्यावर बोलणार नाही. मी त्यांच्यावर टीका केली नव्हती. शिवसेना तीन वेळा फुटली त्यावर वस्तुस्थिती मांडली होती. तरीही काही गैरसमज झाला असेल तर मी सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन दिलगिरी व्यक्त करीन.
केसरकर म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर बोलणार नाही. त्यांची मुले माझ्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे त्यांना लहान आहेत असे म्हटले पण त्याबद्दल त्यांची तक्रार असेल तर बोलणार नाही, पण त्यांनीही थांबले पाहिजे. नारायण राणे यांच्याशी माझे वाद नाहीत, त्यामुळे काही काम निघाले तर नक्की त्यांना भेटेन. आमदार दीपक केसरकर शुक्रवारी रात्री सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे सैनिक आहेत.
यापुढील निवडणुका बाळासाहेबांचे शिवसैनिक शिंदे गट आणि भाजपा निवडणुका जिंकतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने कोकणचे राज्य आले आहे, आता विकासाला नवीन दिशा मिळेल असे त्यांनी सांगताना शिंदे सरकारने सामाजिक बांधिलकी मानून जनतेचे प्रश्न अजेंडय़ावर ठेवून तसे निर्णय घेतलेले आहेत, त्यामुळे जनतेला निश्चितच दिलासा मिळेल.