गुलाम नबी आझाद यांनी केला मोठा खुलासा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना एकच खळबळ उडाली. यानंतर गुलाम नबी आझाद भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता आझाद यांनी स्वतःच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच आपला नवा पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी सांगितलं की, आपल्या समर्थकांना आणि लोकांना भेटण्यासाठी ते लवकरच जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र पाठवल्यानंतर त्यांनी टीव्ही चॅनेलला सांगितलं की, “मी लवकरच जम्मू-काश्मीरला जाणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये माझा पक्ष स्थापन करणार आहे. मी भारतीय जनता पक्षात जाणार नाही’, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
विशेष म्हणजे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी सुमारे पाच दशकांनंतर पक्षाचा निरोप घेतला. त्यांनी दावा केला की, देशातील सर्वात जुना पक्ष आता “पूर्णपणे नष्ट” झाला आहे आणि त्याचं नेतृत्व अंतर्गत निवडणुकांच्या नावाखाली ‘फसवणूक करत आहे.’
त्यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर “अपरिपक्व आणि बालिश वर्तन” असल्याचा आरोप केला आणि ते म्हणाले की, राहुल गांधींचे “सुरक्षा रक्षक आणि वैयक्तिक सहाय्यक” निर्णय घेत असल्याने सोनिया गांधी आता नावालाच नेत्या राहिल्या आहेत. आपल्या राजीनामा पत्रात गुलाम नबी आझाद यांनी अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातल्या काही गोष्टी अशाही होत्या, ज्यांच्या आधारे ते पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासारखा नवा पक्ष स्थापन करू शकतात, असा अंदाज लावला जात होता. आता त्यांनी स्वतःच याबाबत खुलासा केला आहे.