राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. राज्य सरकारकडून अजूनही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर सुद्धा असणार आहे. त्यामुळे नार्वेकर नाराज असल्याच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज औरंगाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पाहणीचा दौरा आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर असणार आहेत.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं हाती आलेलं पिक आडवं झालंय. दिवाळी सणाच्या तोंडावरच अस्मानी संकटात उध्वस्त झालेल्या बळीराजाच्या बांधावर उद्धव ठाकरे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परीषद घेऊन राज्य सरकारकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.
विशेष म्हणजे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शनिवारी ट्विट करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, मिलिंद नार्वेकर यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची मातोश्रीवर सदिच्छा भेट घेतली. यावेळी मिलिंद नार्वेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन आदित्य ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसंच आज उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादच्या दौऱ्यात देखील शिवसेना सचिव म्हणून मिलिंद नार्वेकर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याच्या बातमीला पूर्ण विराम मिळाल्याचं दिसून आलंय.