हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख सुखविंदर सिंग सुखू हे हिमाचलचे नवे मुख्यमंत्री होतील, असे पक्षातर्फे शनिवारी घोषित करण्यात आले. पक्षश्रेष्ठींनी हमीरपूर जिल्ह्यातील नादौन येथून निवडले गेलेले ५८ वर्षीय आमदार सुखू यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित केले आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी मुकेश अग्निहोत्री यांची निवड झाली असून ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. दरम्यान, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी उद्या, रविवारी होणार असल्याचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी जाहीर केले.
हिमाचल प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष सुखू हे चार वेळा आमदारपदी निवडून गेले आहेत. ते पक्षनेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय मानले जातात. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सहा वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेले दिवंगत वीरभद्र सिंह यांचे विरोधक अशी त्यांची ओळख आहे. शनिवारी संध्याकाळी उशिरा सिमला येथे पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत सुखू यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे. विधिमंडळ पक्षाची २४ तासांतील ही दुसरी बैठक असेल. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत आमदारांनी पक्षाध्यक्षांना विधिमंडळ पक्षनेता (मुख्यमंत्री) निवडण्याचे अधिकार देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला होता.
काँग्रेसने ६८ पैकी ४० विधानसभा जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवल्याने हिमाचल प्रदेशमधील भाजपची सत्ता संपुष्टात आली. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष व वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह व विधानसभेतील विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री यांच्यासह अनेक नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. त्यासाठी या इच्छुकांनी मोर्चेबांधणी चालवली होती. विधिमंडळ पक्षाची म्हणजे नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांची बैठक शनिवारी संध्याकाळी विधानसभा भवनातच होणार असल्याची माहिती कुल्लूचे आमदार सुंदर सिंग ठाकर यांनी दिली. याआधी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाचे निरीक्षक हिमाचलला पाठवले असल्याचे सांगितले होते.