आजपर्यंत सिनेमात राजकीय विषय अनेक निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी हाताळला आहे. यामध्ये गेल्यावर्षी पडद्यावर आलेला शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनपटावर बेतलेला धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा. या सिनेमात आनंद दिघे यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आलेल्या अभिनेता प्रसाद ओक याने अफलातून किमया केली . प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या व्यक्तीवर सिनेमा बनवणे हे आता काही नवीन नाही पण ती व्यक्तिरेखा अगदी हुबेहूब साकारणं हे नक्कीच प्रसाद ओक याच्यासमोर आव्हान होतं आणि ते आव्हान त्याने लिलया पेललं . त्याची पोचपावती या सिनेमाने केलेल्या रेकॉर्डब्रेक कमाईने दाखवून दिलीच पण आनंद दिघे या भूमिकेसाठी प्रसाद ओक याने घेतलेली मेहनत यावर देखील प्रेक्षकांनी त्यांच्या पसंतीची मोहर उमटवली. प्रसाद ओकला महाराष्ट्राचा फेवरेट कोण पुरस्कारात महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. याक्षणी बोलताना प्रसादनं त्याच्या भावना व्यक्त केल्यात.
प्रसादच्या आजवरच्या करिअरमधील धर्मवीर हा त्याचा आतापर्यंतचा सर्वात वेगळा सिनेमा ठरला. धर्मवीरसाठी त्याला आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता ठरल्यानंतर प्रसाद म्हणाला, ‘ही भूमिका जेव्हा मला ऑफर करण्यात आली तेव्हा मला स्वतःलाही या भूमिकेचा डोलारा मी पेलू शकेल की नाही याबाबत साशंकता होती .आनंद दिघे यांचा जीवनपटाचा आलेख फार मोठा आहे . त्यांचे बारकावे अभिनयातून साकार करण्यासाठी माझ्यातला अभिनेता अजून कसदार झाला याचा मला विशेष आनंद आहे’.
प्रसाद पुढे म्हणाला, ‘आनंद दिघे यांच्या सहवासातील अनेक व्यक्तींनी जेव्हा मला दिघे साहेबांच्या लुकमध्ये पाहिलं तेव्हा त्यांनाही क्षणभर आपल्यासमोर आनंद दिघे साहेबच उभे आहेत असं वाटलं यातच या व्यक्तिरेखेसाठी केलेल्या लुकचं सार्थक आहे . पण लुक बरोबरच आनंद दिघे ही व्यक्तिरेखा पडद्यावर उभी करणे हे माझ्यातल्या अभिनेत्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं . धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाला मिळालेलं यश, हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला याची मिळालेली पावती आहे. महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता हा पुरस्कार हे सगळेच माझ्या अभिनेता म्हणून प्रवासातील माईल स्टोन आहे असं मला वाटतं’.
धर्मवीर सिनेमानं बॉक्श ऑफिसवर देखील तगडी कमाई केली. 13 मे 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या धर्मवीर सिनेमानं अल्पावधीतच 29.01 कोटींची कमाई केली. अभिनेता प्रविण तरडेनं सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. तर मंगेश देसाईनं सिनेमाची निर्मिती केली होती.