सोनिया गांधी खरंच संन्यास घेणार? दिग्विजय सिंह यांनी केलं स्पष्ट

छत्तीसगडमधील रायपूर येथील काँग्रेसच्या ८५ व्या अधिवेशनात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या राजकीय संन्यासाबाबत सूचक विधान केले. माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे, असे विधान सोनिया गांधी यांनी केले. या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यावरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयं सिंह यांनी भाष्य केले आहे. सोनिया गांधींनी केलेले वक्तव्य फक्त भारत जोडो यात्रेसंदर्भातच होते, असे दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

दिग्विजय सिंह काय म्हणाले?

“सोनिया गांधी यांनी उदयपूरमध्ये काँग्रेसच्या चिंतन शिबिरात भारत जोडो यात्रेसंदर्भात घोषणा केली होती. हीच यात्रा यशस्वीरित्या पार पडली, असे सोनिया गांधी यांना सांगायचे होते,” असे दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले.

सोनिया गांधी काय म्हणाल्या?

सोनिया गांधी यांनी रायपूरमधील काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संबोधिक केले. सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याचेही यावेळी संकेत दिले. “डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली २००४ आणि २००९ साली लोकसभा निवडणुकीत आपला विजय झाला. यामुळे मी वैयक्तिकरित्या समानाधी आहे. मात्र माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे,” असे सोनिया गांधी म्हणाल्या.

मोदी सरकारने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली

सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवरही टीका केली. “भारत देश तसेच काँग्रेससाठी हा आव्हानात्मक काळ आहे. भाजपा, आरएसएसने देशातील प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे. तसेच या संस्था नेस्तनाबूत केल्या आहेत. काही उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेऊन मोदी सरकारने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे,” अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.