कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टा, डेल्टा प्लस कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात पुन्हा एकदा कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक प्रशासनाकडून सोमवारपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहरातील मॉल पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर रेस्टॉरंट दुपारी 4 पर्यंत सुरु ठेवण्यात येतील, त्यानंतर पार्सल सुविधा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अजून एक महत्वाची बाब म्हणजे 4 जुलैपासून विकेंड लग्नसोहळे बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने दुपारी 4 नंतर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुपारी 4 नंतर दुकाने सुरु ठेवल्यास कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही पुन्हा चिंता वाढल्याचं पाहायला मिळत आहे. प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे व्यापाऱ्यांकडून दुपारी 4 नंतर दुकाने बंद करण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. मेन रोड, शालिमार, अशोक स्तंभ, रविवार कारंजा परिसरात पोलिसांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास सांगितलं. पोलिसांच्या पथकाकडून शहरात सर्वत्र दुकानांची तपासणी करण्यात आली.