सध्या राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. दुसरीकडे ही संचार बंदी अधिक कडक करण्याचे नियोजन सुरू असल्याने रोजगारावर परिणाम होण्याची भीती लक्षात घेऊन मजुरांनी आपापल्या गावी जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मुंबईतील उपनगरीय स्टेशन्सवर मोठ्या प्रमाणात मजुरांची गर्दी झाली आहे. कुर्ल्यापासून ते नालासोपाऱ्यापर्यंतच्या जंक्शनवर कुटुंबांच्या मजुरांनी धाव घेतल्याने या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. तसेच स्टेशनमध्ये कुणालाही सर्रासपणे जाऊ देण्यात येत असल्याने या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुडुंब गर्दी कायम आहे. नालासोपाऱ्याहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल खचाखच भरून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. प्रवाशी आणि गावाला जाणाऱ्या मजुरांमुळे लोकल आणि प्लॅटफॉर्म तुडुंब गर्दी भरलेली असून श्वास घ्यायला ही जागा नसल्याचे चित्र नालासोपारा रेल्वे स्थानकात पाहायला मिळत आहे. स्थानकावर अद्यापही कुणाचीही तपासणी केल्या जात नाही. त्यामुळे प्रत्येक प्रवासी हा लोकल पकडून मुंबईच्या दिशेने जात आहे. लोकलच्या गर्दीतून कोरोनाचा साखळी तुटणार कशी हा प्रश्न कायम आहे. नालासोपारा रेल्वेस्थानकातून सकाळच्या वेळेत एकामागून एक जाणाऱ्या लोकल तुडुंब भरून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. अगदी सकाळपासूनच नालासोपाऱ्यात मजुरांनी प्रचंड गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले आहेत.
मुंबईच्या कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनला सतत सातव्या दिवशीही लॉकडाऊनच्या भीतीने गावी जाण्यासाठी परप्रांतीय मजुरांनी प्रचंड गर्दी केली आहे. भागलपूर, पवन आणि गोदान एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी सकाळपासून लांबच लांब रांग लावल्या आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याने प्रशासनाचीही गर्दीला आवर घालण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. अधिक गर्दी वाढू नये आणि आहे ती गर्दी कमी व्हावी यासाठी स्टेशन परिसरात पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे. तसेच स्टेशनबाहेर बॅरेकेटिंग करण्यात आले असून तिकीट असलेल्यांनाच स्टेशनमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. अनेक मजूर विनातिकीट रेल्वे स्थानकामध्ये पोहोचल्याने त्यांना परत पाठवलं जात असून प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे.