रवेदार रबडीची कुल्फीची चव लक्षात राहणारी

भुसावळ खाद्यभ्रमंती 13

आईसक्रिम..भर उन्हाळ्यामधल मोरपीसचं जणु. मिलन कुल्फी ,नाँव्हेल्टी,महावीर ,जवाहर ,प्रभात किती नावं घ्यावी.. प्रत्येकान आपआपलं, एक वैशिष्ठ हे जपलेल.पण खरी मजा ही भाड्याने आईसक्रीम पाँट आणुन,त्यात आईसक्रीम घरी करण्यात…त्या पाँटचं भाड 15-20 रु.असायच.. साधारणपणे संधाकाळी हा कार्यक्रम व्हायचा..पण सुरुवात दुपारपासुनच व्हायची..तो एखाद्या बोह-याच्या दुकानातुन आणायचा..मग बर्फाच्या कारखान्यावर स्वारी..नरसिंहमंदीराच्या बाजुला हा कारखाना होता ( आता आहे कि नाही माहीत नाही ) महाराष्ट्रात असलेल्या नरसिंहाच्या मंदीरांपैकी हे एक असावे किंवा एकमेव..अर्थात जाणकार यावर प्रकाश कमेंटस् रुपाने टाकतीलच..तिथे मग 5-10 रु.ची बर्फाच्या खड्यांची महान खरेदी व्हायची ,नंतर किराणा दुकानावर ..तिथे खडे मीठ घेतल जायचं..सर्वात शेवटी दूध..मित्रमंडळीपैकी एकाच्या घरी हा घाट घातला जायचा , कारण त्याची स्वतंत्र रुम असायची जेणेकरुन धिंगाण्याला मज्जाव नाही. ते दूध आणल कि चांगल उकाळायच व गार झाल कि ते पाँटमध्ये ओतायचं ,झाकण फिरवुन चांगल घट्ट लावायय व हँडल फिरवायला सुरुवात करायची. 1 तासात ते आईसक्रिम तयार व्हायच पण ते किती तयार झालय हे पाहायची घाई ,त्यामुळे दर 10-15 मिनीटांनी झाकण उघडून बघायचं,त्याप्रमाणात हा कालावधी तासाभराने वाढायचाच..हँडल फिरवायला ( भुसावळकर : घुमवायले) सर्व शूरवीर पहिल्या फेरीतच बाद व्हायचे , मग उरायचे निष्ठांवंत कामगार ,ते बिचारे जुंपलेले असायचे. नंतर फक्त सुचना ,सुचना आणि सुचना..1) थोडा बरफ घाला त्येच्यात 2) मीट टाक न रे ,भौ अजुन 3) अरे जोर नी काबे तुह्या अंगात ,बारे गल्लीत त मोठी शान मारतो .. घुमव न जरा हँडेल 4) पाहजा बर भो..तुटल त कोन भरी दीन ते.. अस करत करत ,थोड घट्ट ,थोड पात्तळ असे ते आईसक्रीम (?) तयार व्हायच..बहुदा व्हँनिला फ्लेवरच असायचा कारण तो फ्लेवर तसा खिशाला परवडेबल असायचा..पण अवीट गोडीची चव असायची त्या आईसक्रिमला.अशी चव परत बास्कीन राँबीन्सला पण आली नाही..आमच्या नाशकात एक कुल्फी फार प्रसिध्द..देवांग कुल्फी पण कुल्फी खावी तर की भुसावळचीच..दूधदुभते यासाठी जळगाव,चाळीसगाव ,भुसावळ हे नावाजलेले..तर अश्या भुसावळचा एक कुल्फीवाला बराच प्रसिध्द. ” मिलन कुल्फी “.. याच्याकडची चव अफलातुन होती..रवेदार रबडीची ही कुल्फी 1,2, व 5 रु.या भावाने मिळायची..लोखंडी पेटी त्यात भरपुर बर्फाचे खडे, व खडे मीठ त्यात असायचे व किंमतीप्रमाणे कुल्फीचे लहान मोठे साचे..कुल्फी लवकर घट्ट व्हावी याकरीता पायाने तो गाडी हलवत राहायचा. आपण कुल्फी मागीतली , तो साचा काढुन ,साध्या पाण्याच्या डब्यात सफाईदारपणे फिरवुन ,साच्यातुन वेगळी केलेली कुल्फी आपल्या हातात द्यायचा.कुल्फी संपल्यावर ती काडी बिनदिक्कतपणे चोखुन मगच टाकली जायची ,एवढी छान की कुल्फी होती.गांधी चौकात ही गाडी असायची..जवळच देशमुख डेअरी ( बहुदा हेच नावं होत ,अर्थात चुकल असेल तर कमेंट्समध्ये आमचा कान पिळला जाईलच ) कडे दिनशाँज चे आईसक्रिम मिळायचे ,तेव्हा नविनच सुरु झाल,त्यावेळी त्या ब्रँडचे कोण कौतुक…आजकाल उन्हाळ्याची चाहुल लागली कि पहिला फोन जातो ए.सी.सर्व्हीसिंगला..पण तेव्हा पावल वळायची ती कुंभारवाड्याकडे..तिथे चांगले डेरेदार माठ असायचे..लाल किंवा काळे पण त्यातल्या त्यात काळ्या माठाला प्राधान्य जास्त..होळी नंतर कुंभारवाड्याला फुरसत नसायची ,तिथे गेल कि तो कुंभार तुम्ही निवडलेला माठ एका खापराच्या तुकड्याने वाजवुन दाखवायचा, आपण फक्त मान डोलवायची व तो काळाशार माठ घरी आणायचा..तो माठ घरी आणणं , म्हणजे एक कसरतच असायची कारण यात फक्त हातच नाही तर कपडेही काळेशार होणार याची पुरेपुर खात्री. या माठाचं पाणी फक्त गार असुन चालायच नाही, तर ते सुगंधीपण असायला हवं ,त्याकरीता वाळ्याची खरेदी आली , 5-10 रुपयाचं ते वाळ्याच बंडल माठात टाकल कि ते पाणी ,हल्ली वेगवेगळ्या फ्लेवरमधे मिळणा-या डिटाँक्स वाँटरच्या थोबाडीत मारणारे रुप धारण करायचे , अश्या प्रकारच्या ब-याच ठिकाणी पाणपोई देखील असायच्या..झालच तर नवशक्ती नावाचे आयुर्वेदिक औषधालय होतेच, तिथे खास उन्हाळ्यासाठी म्हणुन ” फालसा ” नावाचं सरबत मिळायच , चव आपल्या हमदर्द का रुह अफ्जा सारखीच पण रुहअफ्जापेक्षा भुसावळकर हे जास्त पसंत करतात. यांचा गुलकंदही छान ! उन्हाळ्याचा अजुन एक उद्योग म्हणजे , खिडक्यांना ,दारांना लावण्यासाठी वाळ्यांच्या तट्टयांची खरेदी..व त्यावर दिवसातुन 2-3 वेळा पाणी घालणे… पण गरम हवा जेव्हा यातुन गार व सुगंधी होवुन आत यायची त्याची सर ए.सी.ला नाही.उन्हाळ्यावर मात करणारे हे सहजसोपे उपाय हल्ली दिसत नाही..याच दिवसात साध ओलं खोब-याचे तुकडे विकणारे विक्रेते पण असायचे..चार – आठ आण्यांमध्ये ते तुकडे मिळायचे..सीझनप्रमाणे द्राक्ष यायला सुरुवात ..सीडलेस द्राक्ष वगैरे चोचले नव्हते..चांगले बिया असलेले घड मिळायचे ,ते घड पातळ लाल कागदांवर रचलेले असायचे..त्याच्याच बाजुला गुढीपाडव्यासाठी लागणारी हार,गाठी,कंगन यांची दुकान सजलेली..गुढीपाडव्याला गुढी उभारल्यावर कढिलिंबाची पाने,त्याचीच कोवळी फुलं,व गुळ यांचा प्रसाद ,तो ब-याचवेळा तोंड वेडवाकड करतच खाल्ला जायचा, गुढी उतरली कि त्या गुढीवर दिवसभर अडकविलेल्या हार गाठींचा फन्ना..त्या गाठी पाण्यात विरघळवुन त्याच पाणी घरातील लहानांना दिल जायचं, उन बाधु नये म्हणुन! आज बरीच बाळं हि माझा ,पेप्सी याच्या बाटल्या रिकाम्या करतात आणि त्यांचे पँरेंट्स ( पालक नाही बर..) कौतुकाने बरळत असतात ” हा पेप्सी हातात दिल्याशिवाय जेवतच नाही” ..काळाचा महिमा ,आमचा “मे” महिना..भुसावळकरांना उन्हाळ्यावर मात करायला अजुन एक पेय असायचे..एका हातगाडीवर भला थोरला माठ किंवा पितळेचे भांडे असायचे त्यावर लाल कापडं गुंडाळलेलं ,आतमध्ये थंडगार ताक व त्यावर पुदिन्याची जुडी सजावटीसाठी…. ते थंडगार ताक एका ग्लासात भरुन, वर ताक मसाला भुरकवुन मिळायचे ,आलं ,हिरवी मिरची,कोथंबीर घातलेल हे ताक मजेशीर लागायचे..हे सर्व कमी कि काय म्हणुन ” गरमीले गरमीच मारते ललित..चाल त बरं चहा पी य ठेसनवर! हे हमखास ठरलेल! म्हणजे एवढे सगळे राडे करुन भुसावळकर ,उन्हाळा परतवून लावतात ते फक्त “चहानेच” जय भुसावळकर..जय दार्जिलींग!

©सारंग जाधव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.