जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनलचे घोडे अडले

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ही निवडणूक अविरोध व्हावी म्हणून सर्वपक्षीय नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, 21 पैकी एक-दोन जागांबाबत एकमत होत नसल्याने सर्वपक्षीय पॅनलचे घोडे अडले आहे. सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेली कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात चर्चेची दुसरी फेरी पार पडली. पण ठोस निर्णय होऊ शकला नाही. आता जागा वाटपाच्या अंतिम निर्णयासाठी पुन्हा बैठक होणार असून, त्यात सर्वपक्षीय पॅनलचा तिढा सुटेल, अशी अपेक्षा आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी रात्री आठ वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, भाजपकडून माजी मंत्री गिरीज महाजन, आमदार सुरेश भोळे तसेच काँग्रेसच्या वतीने आमदार शिरीष चौधरी आणि जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील आदींची उपस्थिती होती. या बैठकीसाठी एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन हे पुन्हा एकत्र आले होते.

निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावर सुमारे तासभर सर्वपक्षीय नेत्यांमध्ये बंदद्वार खल चालला. पण अखेर एक-दोन जागांबाबत निर्णय होऊच शकला नाही.

या बैठकीत बँकेच्या अध्यक्ष पदाचा फॉर्म्युला मात्र, सर्वानुमते ठरला. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस अशा चारही पक्षांनी 5 वर्षांपैकी प्रत्येकी सव्वा-सव्वा वर्षे अध्यक्ष पद भूषवावे, असा निर्णय नेत्यांमध्ये झाला आहे. मात्र, सुरुवातीला नेमक्या कोणत्या पक्षाचा अध्यक्ष असेल, हे अद्याप ठरलेले नाही. निवडणुकीनंतर ऐनवेळी त्याबाबत निर्णय होईल, असे सांगितले जात आहे.

महिन्याभरापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला माजी मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे एकत्र येतात की नाही? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, या बैठकीला हे दोन्ही नेते एकत्र आले होते. विशेष म्हणजे खडसे आणि महाजन हे एकमेकांच्या शेजारीही बसले होते. मात्र, त्यांच्यात संवाद झाला नाही. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देखील दोघांनी एकमेकांची नावे घेणे टाळले होते. एकनाथ खडसे यांनी यापुढे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आपण स्वतः आणि कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसेही इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.