कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने येत्या काही दिवसांत भारतात मोठी इंधन दरवाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. सोमवारी ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीने 2018 नंतर पहिल्यांदाच उच्चांकी पातळी गाठली. त्यामुळे येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅरल 80 डॉलर्स इतका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात वाढ करणे अटळ मानले जात आहे.
गोल्डमॅन सॅक्सच्या अंदाजानुसार या वर्षाच्या अखेरीस ब्रेंट क्रूडची किंमत $ 90 ला स्पर्श करू शकते. जगभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा जोर ओसरल्यानंतर दैनंदिन व्यवहारांना वेग आला आहे. त्यामुळे तेलाची मागणी झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेत नुकत्याच आलेल्या चक्रीवादळ इडाच्या विनाशामुळे तेलाच्या पुरवठ्यावरही गंभीर परिणाम होताना दिसत आहे. कोरोनानंतर कच्च्या तेलाच्या मागणीत इतक्या झपाट्याने वाढ होईल, याचा अंदाज कोणालाही नव्हता. आगामी काळात कच्च्या तेलाचे उत्पादन आणखी घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव चढेच राहतील, असा अंदाज आहे.
कच्च्या तेलाच्या दरवाढीसाठी उत्पादनासोबत अनेक घटक कारणीभूत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक वायूची किंमत वाढली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाला पर्याय उपलब्ध झाल्याचा प्रचार केला जात आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या मागणी-पुरवठ्याचे समीकरण बिघडल्याचे सांगितले जाते. भारताचा विचार करता, गेल्या तीन महिन्यांच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर ऑगस्टमध्ये आयात सर्वाधिक वाढली आहे. जुलै महिन्यानंतर भारतीय रिफायनर्सनी मोठ्याप्रमाणावर तेलाचा साठा करायला सुरुवात केल्यामुळे आयातीत इतकी वाढ नोंदवण्यात आल्याचे समजते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहे.येत्या एक ते दोन आठवड्यांत देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. अनेक शहरांमध्ये ते 110 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सोसून इंधनाचे दर स्थिर ठेवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, लवकरच सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो. दसऱ्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवे उच्चांक प्रस्थापित करतील, असा जाणकारांचा होरा आहे. प्रत्यक्षात असे घडल्यास सामान्य नागरिकांना त्याची प्रचंड झळ सोसावी लागेल.