आसाममध्ये पुरामुळं सर्वत्र हाहाकार माजला आहे. आसाममधल्या सुमारे 32 जिल्ह्यांना पुराचा जोरदार फटका बसला आहे. पुरामुळे या जिल्ह्यांमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सध्या काही भागातला पूर ओसरला असला, तरी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. या भागांमध्ये मदतकार्य वेगानं सुरू आहे. आसाममधल्या पूरस्थितीचा सर्वाधिक त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याकरिता कोणतीही साधनं उपलब्ध होत नसल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत एक व्हिडिओ समोर आला आहे. आसामचे परिवहनमंत्री परिमल सुक्लाबैद्य पुरातून होडी चालवत एक रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाताना या व्हिडिओत दिसत आहेत. खुद्द परिवहन मंत्री रुग्णाच्या मदतीसाठी धावून आल्यानं हा व्हिडिओ जोरदार चर्चेत आहे.
‘एनडीटीव्ही डॉट कॉम’ ने दिलेल्या वृत्तानुसार, आसाममधल्या बहुतांश पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये ब्रह्मपुत्रा आणि बराक या नद्यांसह त्यांच्या उपनद्यांना मोठा पूर आला आहे. राज्यातल्या एकूण 35 जिल्ह्यांपैकी 32 जिल्ह्यांमधला मोठा भूभाग पाण्याखाली गेला आहे. सुमारे 15 दिवसांपूर्वी राज्यात मोठा पूर आला होता. त्या वेळी एका रुग्णाला त्याच्या डायलिसिसच्या नियोजित उपचारांसाठी गरजेचं होतं. त्या वेळी परिवहनमंत्री परिमल सुक्लबैद्य त्याच्या मदतीसाठी धावून आले. त्या वेळी सुक्लबैद्य या रुग्णासाठी चक्क नाविक बनले होते. या व्हिडिओत बराक खोऱ्यातल्या पूरग्रस्त रस्त्यावरून सुक्लबैद्य एका छोट्या होडीतून जाताना दिसत आहेत.
सध्या राज्यात काही ठिकाणी पुराचं पाणी ओसरलं आहे. व्हिडिओत अनेक जण होडीजवळून गुडघाभर पाण्यातून चालताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, परिवहनमंत्री परिमल सुक्लबैद्य सध्या कछारमधल्या सिल्चर येथे तळ ठोकून आहेत. ते स्थानिक आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बराक खोऱ्यातल्या पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
राज्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाममध्ये पूरस्थिती गंभीर आहे आणि 30 जिल्ह्यांमधले 45.34 लाख नागरिक अजूनही पुराच्या तडाख्यात आहेत. आसाममधला बारपेटा जिल्हा पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झाला आहे. या जिल्ह्यातले 10,32,561 नागरिक पूरग्रस्त आहेत.
केंद्र सरकार आसाममधल्या पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसंच या भागातल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी राज्य सरकारशी समन्वय ठेवला जात आहे. पूरग्रस्त भागात भारतीय सेना आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथकं कार्यरत असून, पूरग्रस्त भागातल्या नागरिकांना मदत करत आहेत,` अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे दिली आहे.