काँग्रेसच्या 137 व्या स्थापना दिनी एक अतिशय वाईट बातमी घडली. याला कुणी अपशकून म्हणेल, तर कोणी आणखी काही. मात्र, हे टाळता आले असते. त्याने काँग्रेसची नाहक होणारी नाचक्की, त्यातून उठणारी शब्दांची राळ, अन् हसे झाले नसते. मात्र, काही-काही घटनांची दोरी कुणाच्या हाती नसते, हेच खरे. त्याचे झाले काय की, काँग्रेसच्या हंगामी पक्षाध्यक्ष आणि सर्वेसर्वा सोनिया गांधींनी झेंडा फडकावण्यासाठी दोरी ओढली खरी. मात्र, तो झेंडा त्यांच्याच हातावर येऊन पडला. तेव्हा सारेच सैरभर झाले.
काँग्रेसला सध्या खडतर दिवस असले, तरी या पक्षाचा इतिहास प्रत्येक देशवासायींना अभिमान वाटावा असाच आहे. राजकारणात काही-काही चुका जाणतेपणे आणि अजाणतेपणे साऱ्यांकडूनच होतात. तो अपवाद साऱ्यांनाच लागू होतो. खरे तर स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ब्रिटीश साम्राज्याच्या काळात 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. काँग्रेसच्या संस्थापकांमध्ये एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा या सदस्यांचा समावेश होता. पुढे स्वातंत्र्याचा संग्राम काँग्रेसच्या झेंड्याखाली लढला गेला. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्यात होणार होते. मात्र, त्याकाळी सुरू असलेली प्लेगची साथ पाहता ते मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत घेतले गेले. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोलकात्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचन्द्र बॅनर्जी होते.
काँग्रेसच्या या ऐतिहासक वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा फडकाविण्याचा कार्यक्रम आज होता. मात्र, यावेळी गालबोट लागल्याचे दिसले. सोनिया गांधी यांनी झेंडा फडकावण्यासाठी दोरी ओढली. पक्षाचा झेंडा वर गेला. मात्र, काही क्षणातच तो झेंडा त्यांच्या हातावर येऊन पडला. यामुळे क्षणभर सोनिया गांधी सुद्धा अवाक झाल्या. त्या ठिकाणी उपस्थित असलेले कर्मचारी आणि कार्यकर्ते सैरभर झाले. मात्र, सोनियांनी संयमाने परिस्थिती हाताळली. पुन्हा एकदा रितसर झेंडा फडकावण्यात आला. मात्र, ऐन वर्धापन दिनी ही घटना घडल्याने याची चर्चा चांगलीच रंगलीय.