महान टेनिसस्टार रॉजर फेडररनं गेल्या आठवड्यात स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. 41 वर्षांच्या फेडररनं तब्बल 24 वर्षांची कारकीर्द अचानकपणे थांबवून त्याच्या चाहत्यांना धक्का दिला. 20 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या फेडररनं आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. पण गेल्या काही वर्षात दुखापती आणि त्यामुळे झालेल्या शस्त्रक्रिया यामुळे फेडरर टेनिस कोर्टवर फार कमी दिसला. तीन वर्षात गुडघ्यावर झालेल्या तीन शस्त्रक्रियांमुळे त्यानं अखेर थांबण्याचा निर्णय घेतला. स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा करताना आगामी लेव्हर कप स्पर्धा ही त्याच्या कारकीर्दीतली अखेरची स्पर्धा असल्याचं त्यानं सांगितलं. त्यामुळे लेव्हर कप स्पर्धेचं महत्व कमालीचं वाढलंय. आणि आता स्पर्धेच्या तिकिटाची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
लेव्हर कपचं तिकिट अर्ध्या कोटीवर
लेव्हर कप स्पर्धेत फेडरर टेनिस कोर्टवर शेवटचा खेळताना दिसणार आहे. आधीच या तिकिटाची खरेदी केलेल्यांनी याच संधीचा फायदा घेत सेंकंडरी मार्केटमध्ये तिकिटाची किंमत भरमसाठ वाढवली आहे. त्यामुळे लेव्हर कपच्या एका सामन्याचं तिकिट तब्बल 59 हजार ब्रिटिश पाऊंड इतकं झालं आहे. भारतीय रुपयात त्याची किंमत तब्बल 53 लाखांच्या आसपास आहे. तर कमीत कमी तिकिट 14 लाख रुपये आहे.
कधी होणार लेव्हर कपचे सामने?
लेव्हर कप स्पर्धा हा एक टीम इव्हेंट आहे. युरोप आणि जगातल्या इतर देशातल्या अव्वल टेनिसपटूंमध्ये ही स्पर्धा रंगते. या स्पर्धेत फेडरर टीम युरोपचं प्रतिनिधित्व करतो. फेडररसह स्पेनचा राफेल नदाल आणि सर्बियाचा नोवाक ज्योकोविच हेही टीम युरोपध्ये आहेत. 22 सप्टेंबरला लेव्हर कप स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना खेळवला जाईल. तर रविवारी 25 सप्टेंबरला स्पर्धेची अंतिम लढत होईल. लंडनच्या O2 अरेनामध्ये हे सामने खेळवण्यात येतील. पण फेडरर या स्पर्धेत खेळण्याबाबत अजूनही साशंकता आहे.