कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून सलग दुसऱ्या वर्षी बुद्ध पौर्णिमेला कर्नाळा पक्षी अभयारण्यात पाणवठ्यांवर करण्यात येणारी प्राणी गणना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती कर्नाळा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली आहे.
अभयारण्यात वास्तव्यास असलेल्या प्राण्यांच्या संख्येत होणारे बदल, नव्याने वास्तव्यास आलेले प्राणी यांची स्थिती समजून घेण्यासाठी दर वर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अभयारण्यात असलेल्या पानवठ्यांवर प्राणीगणना (शिरगणती) केली जाते. प्राण्यांच्या नोंदी घेण्यासाठी वन विभागातर्फे दर वर्षी उन्हाळ्यात बुद्धपौणिर्मेच्या आठवड्यात सर्वच अभयारण्यांत प्राण्यांची गणना केली जाते. वनकर्मचारी जंगलात फिरून प्राण्यांच्या पायांचे ठसे आणि विष्ठा गोळा करतात; तसेच वन्यप्राणीप्रेमींच्या सहभागातून वनकर्मचारी सर्वच पाणवठ्यांवर एकाच वेळी 24 तास बसून पाणी पिण्यास येणाऱ्या प्राण्यांच्या नोंदी घेतात.
पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि 12 हजार 155 चौरस किलोमीटरच्या परिसरात पसरलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यातदेखील दर वर्षी प्राणी गणना करण्यात येत होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मधला काही काळ वगळता मागील वर्षापासून कर्नाळा पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला करण्यात येणारी प्राणी गणना गेल्या वर्षीदेखील केली गेली नाही. त्यातच आता यंदादेखील येथील प्राणी गणना होणार नसल्याचे वनविभागाकडून कळवण्यात आले आहे.
कर्नाळा पक्षी अभयारण्यात 2017 साली झालेल्या गणनेत 25 प्रजातींच्या प्राणी आणि पक्षांची नोंद झाली होती, तर 2018 ला त्यात वाढ होऊन 41 प्रजातींचे प्राणी आणि पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती. 12 हजार 155 चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात विविध प्रकारचे वन्य प्राणी आणि पक्षी वास्तव्यास आहेत. तसेच दर वर्षी स्थलांतरित म्हणून कर्नाळा परिसरात येणाऱ्या पक्षांची संख्या देखील मोठी आहे.