राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. सध्याच्या आकडेवारीवरुन कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचीच प्रचिती सध्या नागपुरात येत आहे. नागपुरात रुग्णआलेख कमी होताना दिसतोय. तसेच येथे मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार आज (31 मे) दिवसभरात फक्त 10 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय. काल हीच संख्या 13 होती.
नागपुरात रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. नव्या रुग्णांचा आलेख रोज घटताना दिसतोय. काल दिवसभरात 357 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली होती. तर एकूण 13 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आज हीच आकडेवारी कमी झालीये. आज नागपुरात कोरोनाच्या 319 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीये. तर आज दिवसभरात फक्त 10 बाधितांचा मृत्यू झालाय. कालच्या तुलनेत ही आकडेवारी कमी आहे. मागील काही दिवसांपासून नागपूर सावरत असून रुग्णसंख्या कमी होत आहे.
महिनाभरापूर्वी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय होती. यावेळी नागपूरची परिस्थिती तर फारच गंभीर होती. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच साधारण 1 ते 2 मेदरम्यान नागपुरात रोज 5 हजारच्या आसपास नवे रुग्ण आढळत होते. तर रोज मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 100 च्या पुढे होती. नागपुरात 2 मे रोजी तब्बल 112 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता तर 5007 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली होती. आता ही संख्या चांगलीच घटली आहे.