कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे पुण्याच्या शहरी भागातील निर्बंध अंशत: उठवण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व दुकाने उघडणार आहेत. या दुकानांसाठी सरसकट सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे.
पुण्यातील ग्रामीण भागात अजूनही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. त्यामुळे ग्रामीणचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील निर्बंध कायम राहणार आहेत. केवळ शेती उपयोगी खते, औषधे, बी-बियणे, शेती अवजारे या दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजन देशमुख यांनी दिली.
राज्यातील 13 शहरांमध्ये कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये दुकाने उघडी ठेवता येणार आहेत.
पिंपरी चिंचवड मधील ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालय बंद करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांकडून तसे आदेश देण्यात आले होते.शहरातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.सद्यपरिस्थितीत ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयामध्ये एकही रुग्ण नाही. त्यामुळे रुग्णसंख्येअभावी ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालय बंद करण्यात आले आहे.
मे महिन्याच्या उत्तरार्धात शहरातील रुग्णसंख्येत घट होत आहे. सध्या रुग्णसंख्या पाचशेच्या आतमध्ये आली आहे. रुग्णसंख्या घटल्याने महापालिकेने पाच कोविड केअर सेंटर (सीसीसी) यापूर्वीच बंद केले आहेत.