नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेले एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना आज एनआयएने (NIA) अटक केली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करणे आणि या कटात सहभागी असल्याचा आरोप लावत त्यांना आज एनआयएने अटक केली आहे. त्याच बरोबर अजून दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून आता या प्रकरणात एकूण 10 लोकांना अटक करण्यात आली आहे.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील अंधेरी परिसरातील घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) छापे टाकले आहेत. सकाळी सहा वाजता कारवाईला सुरुवात झाली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण प्रकरणात प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर आहेत. दोनवेळा एनआयएने त्यांची चौकशी केली होती.
एनआयए सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार प्रदीप शर्माने वाझेसोबत या हत्येचा कट रचला. या कामासाठी शर्माने आपली माणसं पुरवली, विनायक शिंदे, लातूर इथून अटक करण्यात आलेले दोन आरोपी संतोष शेलार, आनंद यादव आणि दोन अन्य वाँटेड आरोपी या सगळ्यांनी मिळून शर्माच्या सांगण्यावरुन आधी मनसुखची हत्या केली आणि नंतर लाल रंगाच्या तवेरा गाडीमध्ये मनसुखचा मृत्यदेह घेऊन रेतीबंदरला गेले. रेतीबंदर ही जागा आणि लाल तवेरा गाडी शर्माने उपलब्ध करुन दिली होती. इतकच नाही तर या सगळ्यांना या कामासाठी पैसे आणि काम झाल्यानंतर लपवण्याचं कामही शर्माने केलं. पण अटक माजी पोलीस अधिकारी सुनील मानेच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संतोष शेलार आणि आनंद यादवाला लातूरमधून अटक केली. या दोघांनी शर्माचं नाव एनआयए समोर सांगितलं.
सकाळी सहाच्या सुमारास कोणालाही सुगावा लागू न देता एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा मारला. विशेष म्हणजे याठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, याआधी या प्रकरणात एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची एनआयएकडून चौकशी झाली होती. परंतु, आता थेट छापा टाकून एनआयएनने झाडाझडती सुरु केली आहे. स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरण हत्येमध्ये त्यांचा सहभाग असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. तसेच, याप्रकरणातील आरोपी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा हे मित्र आहेत. याचबरोबर, या प्रकरणात नुकतीच एनआयएने संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक केली होती. संतोष हा प्रदीप शर्मांच्या जवळचा व्यक्ती असल्याचे बोलले जाते. बुधवारी पीएस फाऊंडेशनच्या दोघा जणांनाही एनआयएने चौकशीला बोलावले होते.