नागपुरात आयुष्य जगणारी सुखवस्तू कुटुंबातील एक महिला वेबसीरिजच्या नादात आणि जलद श्रीमंत होण्याच्या हव्यासात अशा गुन्ह्यात अडकली की आज तिच्या हातात बेड्या पडल्या आहेत. स्वतःचा मोठा व्यवसाय सुरु करण्यासाठी तिने डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाची धमकी देऊन एक कोटीची खंडणी उकळण्याचा कट रचला होता. मात्र, खाकी वर्दी समोर तिचा वेबसीरिज पाहून आखलेला प्लॅन पोकळ निघाला आणि तिला अटक झाली.
नागपूरचे प्रसिद्ध डॉक्टर तुषार पांडे आणि त्याच्या पत्नी राजश्री दोघेही डॉक्टर आहेत. मनीषनगर परिसरात त्यांचे उत्कर्ष नर्सिंग होम आहे. 11 जून रोजी डॉ राजश्री यांच्या नावाने रुग्णालयात एक कुरियर आलं. डॉक्टर राजश्री यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 जूनला ते पत्र वाचलं आणि त्या हादरल्याच.कारण त्या पत्रात त्यांच्या दोन्ही मुलांचे अपहरणाची धमकी देत प्रत्येकाच्या नावाने 50 लाख असे एकूण 1 कोटीची खंडणी मागण्यात आली होती. डॉ राजश्री यांनी लगेच त्यांच्या पती डॉ तुषार पांडे यांना माहिती दिली. पत्राची भाषा वाचून धमकी देणारा आपल्या ओळखीतला असावा असा संशय त्यांना आला. एक कोटींची खंडणी देणे शक्य नसल्याने डॉक्टर दाम्पत्त्यानी पोलिसांना माहिती दिली.
खंडणीसाठी आलेल्या पत्रात “अपने छोटे छोटे मासूम बच्चों की सलामती चाहते हो तो एक करोड दो” असा उल्लेखही होता. मात्र पांडे दम्पत्ती यांचे मुलं तेवढे लहान नसल्याने ( 15 ते 18 वर्षांची मुलं आहेत ) धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा सराईत गुन्हेगार नसून तो नवखा असल्याचा संशय पोलिसांना आला. डॉक्टर दाम्पत्यांना पाठवलेले धमकीचे पत्र 8 जून रोजी संध्याकाळी 5 च्या सुमारास डीटीडीसी कुरियर कंपनीच्या कार्यालयातून पाठवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिथले आणि अवतीभवतीच्या सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्यावेळेस फार कमी लोकं कुरियर कंपनीच्या कार्यलयात किंवा त्याच्या अवतीभवती दिसून आले. मात्र, एक्टीव्हा दुचाकीवर एक महिला आणि तिची लहान मुलगी कुरिअर कंपनीत आल्याचे पोलिसांना दिसून आले.
इथून पोलिसांनी उलट्या दिशेने तपास सुरु केला. दुचाकीवरील संबंधित महिलेचा प्रत्येक संभाव्य चौकावरचा फुटेज तपासत तपासत पोलिसांचा तपास शिल्पा सोसायटी पर्यंत पोहोचला… तिथे शोध घेतल्यावर संबंधित दुचाकी आणि महिला दोन्ही आढळूनच आल्या. संबंधित महिलेला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्हा कबूल केला आणि या अपहरणनाट्याचे अनेक धक्कादायक पैलू समोर येऊ लागले.