क्रिकेट विश्वातून सर्वात वाईट आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne) यांचं वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे. ऑस्ट्रेलियाची ही सर्वात मोठी हानी आहे. विशेष म्हणजे फक्त ऑस्ट्रेलियाच नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वासासाठी ही प्रचंड वाईट बातमी आहे. वॉर्न यांच्या निधनामुळे ऑस्ट्रेलियाचं वैयक्तिक खूप मोठं नुकसान झालं आहे. ऑस्ट्रेलियासाठी आज खूप वाईट दिवस आहे. कारण ऑस्ट्रेलियाने आजच्या एकाच दिवसात दोन महान क्रिकेटपटूंना गमावलं आहे. वॉर्न यांच्या निधनाच्या बातमीआधी काही तासांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे महान विकेटकिपर रॉड मार्श (Rod Marsh) यांचे निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. मार्श यांना काही दिवसांपूर्वी हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर ते कोमात होते.
रॉड मार्श यांच्या निधनावर शेन वॉर्न यांनी आज ट्विटरवर शोक व्यक्त केला होता. त्यानंतर काही तासांनी शेन वॉर्न यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्याचं निधन झालं. ऑस्ट्रेलियाच्या वृत्त संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, शेन वॉर्न हे थायलंडमध्ये होते. तिथे ते व्हिलामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, शेन वॉर्न यांनी केलेलं शेवटचं ट्विट देखील चर्चेत आलं आहे. वॉर्न यांनी रॉड मार्श यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर त्यांचं निधन झाल्याने संपूर्ण चाहत्यांकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे. “रॉड मार्श गेल्याची बातमी ऐकून दुःख झाले. ते आमच्या महान खेळाचे एक आख्यायिका होते आणि अनेक तरुण मुला-मुलींसाठी एक प्रेरणा होते. रॉड यांना क्रिकेटची खूप काळजी होती आणि त्यांनी खूप काही दिले. विशेषतः ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना. रॉस यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो”, असं शेन वॉर्न शेवटच्या ट्विटमध्ये म्हणाले होते.
रॉड मार्श यांच्या कारकिर्दीविषयी
रॉड मार्श यांनी 1970 ते 84 कालावधीमध्ये 96 टेस्ट खेळल्या. या कालावधीमध्ये त्यांनी स्टंपच्या मागे 355 विकेट्स घेतल्या. जो तेव्हा एक रेकॉर्ड होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन विकेटकिपर इयान हिलीनं (395) हा रेकॉर्ड तोडला. मार्श यांनी 92 वन-डेमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले.
आजही सर्वात यशस्वी 5 विकेट किपरमध्ये मार्शचा समावेश होतो. दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचरचं स्टंपच्या मागे सर्वात जास्त 555 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर अॅडम गिलख्रिस्ट (416), इयान हिली आणि रॉड मार्श यांचा नंबर आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) 294 विकेट्सह पाचव्या क्रमांकावर आहे. मार्श यांच्या निधनानं क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.
रॉड मार्श यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या तरूण क्रिकेटपटूंचा शोध घेण्याचे काम केले. ते 2016 साली ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.