युक्रेनमधून १० लाखांहून
अधिक नागरिकांचे स्थलांतर
दक्षिण युक्रेनमध्ये युद्धाची तीव्रता वाढली आहे. येथील मारियुपॉल, चेर्निहाइव्ह आणि खार्किव्ह येथे गोळीबार, क्षेपणास्त्र मारा सातत्याने सुरु आहे. खेर्सन शहरावर रशियाने ताबा मिळवला आहे. तर दुसरीकडे अझोव्ह समुद्रावरील मोक्याच्या बंदराच्या सीमेवर असणाऱ्या मारियुपोल शहरामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. काळ्या समुद्राच्या बंदरातील स्थानिक सरकारी मुख्यालय रशियाने ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला अधिकाऱ्यांचा दुजोरा दिलाय. आठवड्याभरात युक्रेनमधून १० लाखांहून अधिक नागरिकांचे शेजारी देशांमध्ये स्थलांतर केल्याची माहिती दिलीय.
दोन शहरात रशियाकडून
युद्धविरामाची घोषणा
युद्धाच्या १० व्या दिवशी रशियाने युक्रेनमध्ये युद्धविरामाची घोषणा केली आहे. रशियाने नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडता यावं, यासाठी मानवतावादी मार्ग उघडण्यासाठी 06:00 GMT पासून युक्रेनमध्ये युद्धविराम घोषित केला आहे,” असे वृत्त रशियाचे मीडिया आउटलेट स्पुतनिकने दिले आहे. मारियुपोल आणि वोलनोवाखा येथील रहिवाशांना बाहेर काढू देण्यासाठी युद्धविरामाची घोषणा केल्याचं रशियाने म्हटलंय.
जी ७ या राष्ट्रांच्या गटांची
पुतिन यांच्याविरोधात भूमिका
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यासंदर्भात जी ७ या राष्ट्रांच्या गटांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात भूमिका घेतलीय. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडा या सात राष्ट्रांचा गट असणाऱ्या जी सेव्हनमधील राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी रशियाने युक्रेनमधील युद्धासंदर्भात महत्वाचं भाष्य केलंय. युक्रेनमध्ये सर्वसामान्यांवर केलेल्या लष्करी हल्ल्यासाठी जे लोक कारणीभूत आहेत त्यांना जबाबदार धरलं पाहिजे असं मत व्यक्त केलंय. या हल्ल्यांमध्ये क्लस्टर बॉम्बसारख्या बंदी घालण्यात आलेल्या अस्त्रांचा वापर करण्यात आल्याने या गुन्ह्यांसाठी योग्य ती कारवाई करणं गरजेचं असल्याचं जी सेव्हनमधील राष्ट्रांनी म्हटलंय.
देशाचे माजी लष्करप्रमुख
जनरल रॉड्रिग्ज यांचे निधन
देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल सुनीत फ्रान्सिस रॉड्रिग्ज यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांनी १९९० ते १९९३ दरम्यान लष्कराचे नेतृत्व केले होते. २००४ ते २०१० दरम्यान ते पंजाबचे राज्यपालही होते. भारतीय सैन्यदलातर्फे ट्विटरवर ही माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या निधनाबद्दल लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्यासह भारतीय सैन्यदलाने तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पुणे मेट्रोचे काम झालेले नसताना
उद्घाटन कसे होत आहे : शरद पवार
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडला येऊन मेट्रो स्थानकांची पाहणी करून मेट्रोतून प्रवासही केला होता. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावरुन शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देशाचे पंतप्रधान उद्या या ठिकाणी येत आहेत. त्यांचे काही कार्यक्रम होत असतील तर तक्रार करण्याचे कारण नाही. मेट्रो रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. एका महिन्यापूर्वी मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवण्यासाठी नेले होते. जेथून मेट्रो धावणार आहे तेथून मी प्रवासही केला. त्यावेळी मेट्रोचे काम झालेले नाही हे माझ्या लक्षात आले. काम झालेले नसतानाही उद्घाटन होत आहे. माझी त्याबद्दल काही तक्रार नाही,” असे शरद पवार यांनी म्हटले
मी मरेन पण तुम्हाला खोटं
बोलू शकत नाही : राहुल गांधी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वाराणसी येथील एक सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, “मी मरेन पण तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही की १५ लाख रुपये घ्या आणि बँक खात्यात जमा करा. तुम्हाला चांगलं वाटेल, नाही वाटणार पण मला काही फरक नाही पडत. कारण, मी तुमचा एवढा आदर करतो की मी तुम्हाला खोटं बोलू शकत नाही.” असंही राहुल गांधी यांनी यावेळी बोलून दाखवलं. या प्रसंगी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची देखील उपस्थिती होती.
फेसबुक लाइव्ह सुरु असताना
तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. फेसबुक लाइव्ह सुरु असताना एका शेतकऱ्याने विषप्राशन करुन आत्महत्या केलीय. पंढरपूरमधील मगरवाडीमधील सूरज जाधव नावाच्या शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललं.
२६ वर्षीय सूरजचा कीटकनाशक पितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये सूरज पुन्हा जन्म मिळालाच तर शेतकरी म्हणून मिळू नये असं सांगताना दिसतोय. “माझं आयुष्य इतकच होतं. मला पुन्हा शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाहीय, कारण शेतकरी हा असमर्थ, दुबळा असतो,” असं सूरज या व्हिडीओत म्हणताना दिसतोय.
इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये त्रुटी
बोर्डाकडून मार्क मिळणार
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. विद्यार्थ्यांना आता बोर्डाकडून गुण मिळणार आहेत. इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये त्रुटी असल्याने विद्यार्थ्यांना बोर्डाकडून मार्क मिळणार आहेत. ‘झी २४ तास’च्या बातमीनंतर बोर्डानं हा निर्णय घेतला आहे.
बारावी बोर्ड परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर होता. या पेपरमध्ये एका प्रश्न चुकीच्या पद्धतीनं विचारण्यात आला होता.
परदेशी वैद्यकीय पदवीधरांना
भारतात इंटर्नशिप करता येणार
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने शुक्रवारी एक परिपत्रक जारी करून परदेशी वैद्यकीय पदवीधरांना करोना विषाणू तसेच युक्रेनमधील युद्ध यांसारख्या त्यांच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीमुळे अपूर्ण इंटर्नशिप देशात पूर्ण करण्याची परवानगी दिली आहे. आयोगाने सांगितले की, जर उमेदवारांनी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (FMGE) उत्तीर्ण केली असेल तर इंटर्नशिप पूर्ण करण्याच्या अर्जावर राज्य वैद्यकीय परिषदेद्वारे प्रक्रिया केली जाऊ शकते.
रशियामध्ये फेसबुक, ट्विटर,
युट्यूब पुर्णपणे बंद
रशिया आणि युक्रेनचं युद्धामुळे अनेक कंपन्यांना अर्थिक फटका बसला असल्याचे पाहायला मिळत आहे. पण रशियाने आता सोशल मीडियाच्या कंपन्यांना टार्गेट केलं असून त्यांनी फेसबुक, ट्विटर, युट्यूब बंद म्हणजे ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडिया कंपन्यांवर आरोप केला आहे की, या कंपन्या रशियाच्या कंपन्यांशी भेदभाव करीत आहेत.
युक्रेनमधील विद्यार्थ्यांची
चिंता वाटतेय : न्यायालय
युक्रेनमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्न सध्या अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. केंद्रातील सरकारकडून विशेष मोहीम राबवून युद्धग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आम्ही यापूर्वी झालेल्या चुकांपासून धडा घ्यायला हवा होता. मात्र आपण काहीच शिकलो नाही ही दुर्दैवी बाब आहे. आम्हाला केंद्र सरकारबाबत काही बोलायचे नाही. मात्र युद्धग्रस्त युक्रेनमधील अडकलेल्या विद्यार्थ्यांची चिंता वाटतेय, अशा शब्दांत न्यायालयाने चिंतेचा सूर आळवला.
SD social media
9850 60 35 90