अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येत असते मात्रं भविष्यात तिला कोणती भूमिका करायला आवडेल असं विचारल्यावर तिने दिलेलं उत्तर चकित करणारं आहे. कारण सईला पुरुषाची भूमिका करायची आहे. ‘मित्रम्हणे’ या पॉडकास्टवर बोलताना सईने आपली ही इच्छा व्यक्त केली आहे. सईचा ‘पाँडीचेरी’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. स्मार्टफोनवर चित्रीकरण करून प्रदर्शित होणारा ‘पाँडीचेरी’ हा भारतातील पहिला मराठी चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. त्या निमित्ताने सईने मित्रम्हणे या मराठी पॉडकास्ट शोवर दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी बोलताना तिने आपल्याला पुरुषाची भूमिका करायला आवडेल असं सांगितलं. तसेच ऐतिहासिक चित्रपटात देखील एखादी चांगली भूमिका करायची इच्छा यावेळी सईने व्यक्त केली.
पाँडीचेरीमध्ये सई ताम्हणकरने साकारलेल्या भूमिकेचं देखील कौतुक केलं जात आहे. या सिनेमात ती मराठी, तामिळ, फ्रेंच, हिंदी आणि इंग्रजी अशा पाच भाषा बोलली आहे.
चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, नीना कुलकर्णी, महेश मांजरेकर, गौरव घाटणेकर आणि तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर मिलिंद जोग यांनी छायाचित्रणकाराची भूमिका निभावत निसर्गरम्य ‘पाँडीचेरी’ आणि तिथे निर्माण होणारे भावनिक नातेसंबंध टिपले आहेत.
सई ताम्हणकर आपल्या भूमिकेबद्दल सांगते, ” यात मी अशी व्यक्तिरेखा साकारत आहे, जी तिच्या पतीच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहात आहे. यात मी मराठी, तामिळ, फ्रेंच, हिंदी आणि इंग्रजी अशा पाच भाषा बोलले आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूपच निराळा आहे. इतका उत्कृष्ट चित्रपट आणि इतकी दमदार व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते. हा संपूर्ण चित्रपट आयफोनवर चित्रित करण्यात आला आहे, मात्र चित्रपट पाहताना हे कुठेही जाणवणार नाही.” तर वैभव तत्ववादी आपल्या व्यक्तिरेखेबद्दल सांगतो, ”माझ्या व्यक्तिरेखेला अनेक छटा आहेत. ज्या चित्रपटातील प्रत्येक मूडला साजेशा आहेत. एक अशी कथा जी पॉंडीचेरी शहरावर आधारित आहे, याच गोष्टीने माझे पहिले लक्ष वेधून घेतले.”