टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि पाक यांच्यातील सामना चांगलाच रंगला. पाकिस्तानने भारताला अगदी सहज पराभूत केलं. पाकिस्तानी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज तग धरू शकले नाहीत. पाकचा गोलंदाज शाहीन आफ्रिदीने तर कमाल केली. पहिल्या दोन षटकांत त्याने भारताच्या चक्क दोन गड्यांना बाद करण्याची किमया करुन दाखवली आहे. मात्र या सामन्यात अंपायरने मोठी चूक केल्याचा आरोप केला जातोय. के. एल. राहुलला चुकीच्या पद्धतीने बाद ठरवलं गेल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तसे काही फोटोदेखील व्हायरल होत आहेत.
भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात भारताला हार पत्करावी लागली. पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदीने अतिशय उत्तमरित्या गोलंदाजी केली. त्याने दोन षटकांत भारताच्या दोन खेळाडूंना तंबूत पाठवलं. पहिल्या षटकात रोहित शर्मा शून्यावर बाद झाला.
तर दुसऱ्या षटकात शाहीनने के.एल. राहुलला तीन धावांवर बाद केलं. मात्र, यावेळी ज्या चेंडूने राहुल बाद झाला तो नो बॉल असल्याचा आरोप होत आहे. नेटकऱ्यांनी तसे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. ही चूक अंपायरला दिसली नाही का ? असा सवाल नेटकरी करत आहेत.
दरम्यान, भारतीय संघाचा प्रत्येक खेळाडू गुडघ्यावर बसला आहे. तसेच सामना सुरु होण्यापूर्वीदेखील सर्व खेळाडू सोबतच गुडघ्यावर बसल्याचे पाहायला मिळाले. हा प्रकार नेमका काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र भारतीय संघाने सध्या देशभर सुरु असलेल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर या चळवळीला समर्थन दिलं आहे. गेल्या वर्षी कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड यांची हत्या करण्यात आली होती. याच हत्येनंतर संपूर्ण जगभरात या चळवळीने जोर धरला आहे.