क्रुझवर झालेल्या छापेमारीनंतर सत्ताधाऱ्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना घेरले आहे. सत्ताधाऱ्यांकडून वानखेडेंची पोलखोल केली जात असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. समीर वानखेडे यांना संरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे. राज्यपालांना भेटून त्याबाबतची मागणी करण्यात येणार आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच वानखेडे मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केलं जातंय, असा आरोपही आठवले यांनी केला.
रामदास आठवले यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. समीर वानखडे हे एक प्रामाणिक अधिकारी आहेत. गेल्या वर्षभरात समीर वानखेडे यांनी अनेक धाडी टाकून चांगली कामगिरी केली आहे. पण त्यांनी काही चुकीचं केल असेल तर त्यांच्यावर कोर्टाने ताशेरे ओढले असते. वानखेडे हे एक मागासवर्गीय अधिकारी आहेत त्यामुळे त्यांना टार्गेट केले जात आहे, असं आठवले म्हणाले.
नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच काम घालण्याची भाषा करत आहे हे चुकीचं आहे. मलिक यांच्या जावयाला अमली पदार्थांच्या संदर्भात अटक झालेली आहे. त्याचमुळे अशी वक्तव्य मलिक करत आहेत. नुसती केंद्र सरकारवर आगपाखड करण्याचं काम मलिक करत आहेत. पण वानखेडे यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे राहणार आहोत, असं सांगतानाच वानखेडे यांचं जर काही चुकत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
प्रभाकर साईल या केपी गोसावीच्या बॉडीगार्डचीही चौकशी झाली पाहिजे. प्रभाकर साईल यांच्यावर जर राजकीय दबाव असेल तर त्या राजकीय दबावाचा देखील तपास पोलिसांनी करणं गरजेचं आहे, अशी मागणीही त्यांनी केली. आर्यनला पकडू नये यासाठी डिलिंग होऊ शकते, पण आर्यनला पकडल्यानंतर ही सगळी डिलिंग कशी होते? सवालही त्यांनी केला. शाहरुख खान यांना पैसे द्यायचेत असतील तर जेव्हा आर्यनला पकडलं तेव्हाच ही प्रोसेज झाली असती. पण आता एनसीबीने या प्रकरणात चार्जेस लावलेले आहेत आणि कोर्टात केस स्टँड झालेली आहे. आता या प्रकरणाची डिलिंग चौकशी होऊ शकते?, असा सवालही त्यांनी केला.
आर्यन खान लहान आहे, पण शाहरुख खान कलाकार म्हणून महान आहे. आर्यनला आता सबक शिकलेला आहे. आर्यनला ड्रग्स मुक्त करा, असं आवाहन मी शाहरुख खानला करतो. आमच्या मंत्रालायत ड्रग्स मुक्ती केंद्र आहे. आम्ही 2 ते 3 महिन्यात आर्यनला ड्रग्ज मुक्त करू, असंही त्यांनी सांगितलं.