मंकीपॉक्सचे गांभीर्य ओळखत
आरोग्य संघटनेने तातडीची बैठक
जगभरात Monkeypox ची प्रकरणं झपाट्याने वाढताना दिसतायत. तर युरोपमध्ये धोक्याची घंटा वाजली रूग्णसंख्येचा आलेख वाढतेय. युरोपमध्ये 100 मंकीपॉक्सचे रुग्ण आढळलेत. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत जागतिक आरोग्य संघटनेने तातडीची बैठक घेतली. मंकीपॉक्सला महामारी म्हणून घोषित करायचं की नाही यावर चर्चा झाली.
बिहार मध्ये वीज पडून,
वादळामुळे 33 जणांचा मृत्यू
वादळी वारे, मेघगर्जनेसहीत बिहारमधील अनेक भागांमध्ये पाऊस पडला. काही तासांच्या या पावसामुळे मोठं नुकसान झालं असून वीज पडल्याने तसेच वादळी पावसाच्या तडाख्याने १६ जिल्ह्यांमध्ये ३३ जणांचा मृत्यू झालाय. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतची घोषणा केलीय. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. बिहारमधील या आस्मानी संकटासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही खेद व्यक्त करतानाच, मदतीचं आश्वासन दिलं आहे.
कोणी आम्हाला छेडले तर सोडणार
नाही : राजनाथ सिंह
भारत पूर्णपणे सुरक्षित आहे. जगातील कोणतीच ताकद भारताकडे डोळे वर करून पाहू शकत नाही. आम्ही कोणाला छेडणार नाही. मात्र कोणी आम्हाला छेडले तर सोडणार नाही, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामांमुळे गेल्या पाच वर्षांत देश आर्थिक श्रेणीत अग्रेसर आहे, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजप शहर पदाधिकाऱ्यांशी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी संवाद साधला.
लाल महल हा नाचण्याच्या
चित्रिकरणासाठी नाही : उदयनराजे भोसले
पुण्यातील ऐतिहासिक लाल महलमधील लावणी प्रकारावरुन छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकाराला कोणत्या अटी शर्तींवर परवानगी दिली गेली, असा थेट सवाल उदयनराजे यांनी विचारला आहे. या वास्तूत कोणत्या हेतूने चित्रीकरण झाले, असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे. दोषींवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. लाल महल हा नाचण्याच्या चित्रिकरणासाठी नाही. या वास्तूचा व्यावसायिक वापर खपवून घेणार नाही, असा इशारा उदयनराजे यांनी यावेळी दिला.
मुलांकडे तुमची नोकरी सोपवा,
TATA स्टीलची कर्मचाऱ्यांना ऑफर
टाटा स्टीलने कंपनीमध्ये विशिष्ट कालावधीसाठी सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ESS अर्थात अर्ली सेपरेशन आणि जॉब फॉर जॉब योजना जाहीर केली आहे. कंपनीचे कर्मचारी 1 जून ते 30 जून या कालावधीत या दोन्ही योजनांसाठी अर्ज करु शकतात. जॉब फॉर जॉब योजनेंतर्गत, कर्मचारी त्यांचा मुलगा, मुलगी, जावई किंवा इतर कोणत्याही संबंधित व्यक्तीचे नाव देऊन नोकरी हस्तांतरित करु शकतील. टाटा स्टीलच्या या दोन योजना एकत्र करुन कंपनीने त्याचे नाव दिले आहे, ‘गोल्डन फ्युचर प्लॅन’. यासाठी टाटा स्टीलचे उपाध्यक्ष (एचआरएम) अत्रयी सन्याल यांच्या आदेशाने एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
अकरावीच्या प्रवेशासाठी
नवे वेळापत्रक जारी
पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ३० मेपासून प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकात बदल करून नवीन वेळापत्रक शिक्षण विभागाने शनिवारी जाहीर केले असून, २३ ते २७ मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव करता येईल.
ज्ञानवापी येथे सापडलेली शिवलिंग
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक
विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) प्रमुख आलोक कुमार यांनी ज्ञानवापी मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला सहमती दर्शवली आणि दावा केला की सापडलेले शिवलिंग १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हे हिंदू पक्ष सिद्ध करू शकेल. “हे प्रकरण गुंतागुंतीचे आहे आणि त्यासाठी गंभीर आणि अनुभवी न्यायमूर्तींची गरज आहे, यावर आम्ही सर्वोच्च न्यायालयाशी सहमत आहोत. जिल्हा न्यायालय यात लक्ष घालेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाशी सहमत आहोत,” असे आलोक कुमार यांनी म्हटले आहे.
जुन्नरमधील शौर्य किशोर काकडेची
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये
पुण्याच्या जुन्नरमधील सात वर्षांच्या चिमुकल्यानं आगळीवेगळी करामत करून दाखवली आहे. त्यानं प्ले कार्ड तब्बल १३९ फूट लांब फेकल्याने त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. शौर्य किशोर काकडे अस या अवलियाचे नाव आहे. दोन्ही बोटांमध्ये पत्ता धरून तो हवेत भिरकावतो. गेल्या वर्षभरापासून तो सराव करत असून २१७ फुटांचा रेकॉर्ड त्याला ब्रेक करायचा असल्याचं त्याचे वडील किशोर काकडे सांगतात. शौर्य वाऱ्याच्या गतीने पत्ता फेकतो. कधी-कधी या पत्त्याचा वेग इतका असतो की हा पत्ता एखाद्या टरबूजच्या मधोमध रुतलेला पहायला मिळतो.
पुण्यात आहे भारतातील पहिलं मिनिएचर संग्रहालय; लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही घेतली नोंद
भारतात अनेक संग्रहालये आहेत. प्राणी संग्रहालये आहेत. मोठमोठी ग्रंथालये आहेत. यातच आज आपण भारतातील पहिले मिनिएचर संग्रहालये काय आहे? याबद्दल जाणून घेणार आहोत. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, असे म्हटलं जातं. याच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी पुण्यात हे भारतातील पहिलं मिनिएचर संग्रहालय आहे. रवी जोशी यांच्या मालकीचे हे संग्रहालय आहे. या संग्रहालयाची उभारणी 1998 साली करण्यात आली. रवी जोशी यांच्या वडिलांनी ही उभारणी केली होती. भारतातील हे पहिलंच मिनिएचर संग्रहालय आहे. या संग्रहालयाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने देखील घेतली आहे. संग्रहालयातील वस्तू या मूळ स्वरुपाच्या वस्तूंपेक्षा 85 -87 पटीने लहान आहेत. एकूण 18 मीटर लांबीच्या व्यासामध्ये हे मिनिएचर शहर वसवले आहे.
ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर होणार देशव्यापी आंदोलन! आयबीचा गंभीर इशारा
सध्या देशभर ज्ञानवापी मशिदीच्या व्हिडिओग्राफिक सर्व्हेचं प्रकरण गाजत आहे. हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता असल्याचा इशारा इंटेलिजन्स ब्युरोनं (IB) दिला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल आणि स्पेशल ब्रँचची टीम गेल्या एका आठवड्यापासून अत्यंत सतर्क आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थेला (IB) काही दिवसांपूर्वी एक इनपूट मिळालं होतं. ज्ञानवापी मशीद प्रकरण, अल्पसंख्याकांशी संबंधित मुद्दे, मदरसा आणि द प्लेसेस ऑफ वर्शिप अॕक्ट 1991या बाबत अफवा पसरवून विशिष्ट धर्माचं देशव्यापी आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न होईल. केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारचा या आंदोलनातून विरोध केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती आयबीला मिळाली होती.
SD social media
9850 60 3590