तरुणींवर रंग उडवाल तर…; तरुणांनो होळीआधी हे जरूर वाचा

थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागते, तेव्हा होळीचा सण भारतात साजरा केला जातो. देशाच्या अनेक प्रांतांत होळीची नावं वेगवेगळी आहेत, तशीच ती साजरी करण्याच्या पद्धतीही भिन्न आहेत. महाराष्ट्रात होळी, शिमगा, होलिकादहन अशा नावांनी परिचित असलेली होळी उत्तरेत होली, होलिकादहन, हुताशनी, फागुन अशा विविध नावांनी साजरी केली जाते. महाराष्ट्रात लाकडं, गोवऱ्यांच्या साह्यानं अग्नी प्रज्ज्वलित करून वाईट गोष्टी नष्ट होऊ दे अशी इच्छा व्यक्त केली जाते. इतर बहुतेक ठिकाणी मात्र होळी रंग व फुलांच्या माध्यमातून खेळली जाते. झारखंडच्या आदिवासी भागात होळीसंदर्भात अशीच एक वेगळी प्रथा आहे. तिथल्या संथाल समाजात एखाद्या तरुणानं मुलीवर रंग टाकला, तर त्याला तिच्याशी लग्न करावं लागतं. नाही केल्यास समाज देईल ती शिक्षा भोगावी लागते. ‘समाचारनामा’नं त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.

उत्तर भारतात होळीचा सण यंदा 7-8 मार्चला साजरा होणार आहे. तिथे या सणाला विशेष महत्त्व असतं. ‘होली है’ असं म्हणत एकमेकांच्या अंगावर रंग उडवून होळीचा सण साजरा होतो. झारखंडमधील आदिवासी भागांतही होळीची विशेष परंपरा आहे. इथल्या संथाल या आदिवासी समाजात प्रत्यक्ष होळीच्या 15 दिवस आधीपासूनच होळीची सुरुवात झाली आहे. पाणी आणि फुलांनी ही होळी खेळली जाते. याला बहा पर्व असं म्हटलं जातं. या समाजात स्री-पुरुष एकमेकांना रंग लावू शकत नाहीत. जर एखाद्या तरुणानं रंग लावलाच तर त्याला त्या मुलीशी लग्न करावं लागतं.

बहा पर्व वेगवेगळ्या गावांत वेगवेगळ्या तिथीनुसार सुरू होतं. हा फुलांचा उत्सव असून त्यात निसर्गाची पूजा केली जाते. त्यात धनुष्य-बाणाची पूजा केली जाते. ढोल वाजवले जातात आणि नृत्य करून सण साजरा केला जातो. एकमेकांवर पाणी उडवून होळी खेळली जाते. एखाद्या मुलीसोबत अशा पद्धतीनं होळी खेळली तर याचा अर्थ मुलीला लग्नासाठी विचारणं असा होतो. मात्र मुलीनं नकार दिल्यास त्याला व्यभिचार समजून त्या मुलाला त्याची संपत्ती मुलीच्या नावावर करण्याची शिक्षा भोगावी लागू शकते. झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यापासून पश्चिम बंगालमधील जलपैगुडीपर्यंत ही परंपरा मानली जाते.

झारखंडच्या संथाली समाजात निसर्ग पूजनाची अशी परंपरा असल्याचं देशभक्त मधू सोरेन यांनी म्हटलं आहे. बहा उत्सवात संथाली लोकं साल वृक्षाची फुलं आणि पानं यांचा पोषाख करतात. जसा पानांचा रंग बदलत नाही, तशाच समाज त्यांच्या प्रथाही बदलत नाही, हे सांगण्याचा यामागचा उद्देश असतो. बहा पर्वात ज्या व्यक्तीची पूजा केली जाते, त्याला नायकी बाबा असं म्हणतात. पूजेनंतर सुखा, मोह आणि साल वृक्षाची फुलं वाटली जातात. या पुजेनंतर समाजातील लग्न होतात. काही ठिकाणी रंग खेळल्यानंतर जंगली श्वापदांची शिकार करण्याची प्रथा आहे. त्याचं गावजेवणही दिलं जातं.

झारखंडमधील या अनोख्या प्रथेमुळे मुलं व मुली एकत्र होळी खेळत नाहीत. समाजाकडून मिळणाऱ्या शिक्षेच्या भीतीमुळे पुरुष पुरुषांसोबतच होळी खेळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.