महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पहिल्या हंगामासाठी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरकडे मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.हरमनप्रीतने नुकतेच १५० आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने पूर्ण केले. गेल्या दशकभरात भारतीय संघाने मिळवलेल्या यशात हरमनप्रीतने महत्त्वाचे योगदान दिले आहे. अर्जुन पुरस्कारप्राप्त हरमनप्रीतच्या नावे महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक नाबाद १७१ धावांचा विक्रमही आहे.
हरमनप्रीत मुंबई संघाची मुख्य प्रशिक्षक शार्लेट एडवर्डसविरुद्ध, तर या संघाची प्रेरक आणि गोलंदाजी प्रशिक्षक झुलन गोस्वामीसोबत खेळली आहे. तिने जगातील इतर ट्वेन्टी-२० लीगमध्ये सहभाग नोंदवला आहे. महिला क्रिकेटमधील नावाजलेल्या खेळाडूंसह अनेक युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या मुंबई संघाचे आता ती नेतृत्व करेल. ४ मार्चला डी. वाय. पाटील स्टेडियम येथे होणाऱ्या ‘डब्ल्यूपीएल’च्या सलामीच्या लढतीत मुंबईपुढे गुजरात जायंट्सचे आव्हान असेल.
‘डब्ल्यूपीएल’ सामन्यांसाठी महिला व मुलींना मोफत प्रवेश
‘डब्ल्यूपीएल’च्या पहिल्या हंगामात महिला आणि मुलींना सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी भारत आणि ऑस्ट्रेलिया या महिला संघांदरम्यान झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेतही महिला व मुलींना प्रवेश मोफत होता. महिलांचे सामने अधिकाधिक लोकांनी पाहावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुले आणि पुरुषांकरता १०० व ४०० रुपये आकारण्यात येतील.