विधान परिषदेची निवडणूक
11 उमेदवार रिंगणात
राज्यसभेसारखीच विधानपरिषदेची निवडणूक जोरदार रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय. कारण अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली असली तरी भाजपसह मविआनंही आपला पाचवा उमेदवार निवडणुकीत कायम ठेवलाय. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत चुरस रंगणार आहे. बिनविरोध निवडणूक करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसवर एक उमेदवार मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र काँग्रेसनं दुसरा उमेदवारही कायम ठेवला. आता 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत.
सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी
अर्ज ऐनवेळी माघारी
विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष सावध झाले आहेत. २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक गुप्त पद्धतीने होणार असल्याने मोठा दगाफटका होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. शेवटच्या पंधरा मिनिटांपर्यंत कोणत्याही पक्षाकडून अर्ज मागे घेण्यात आला नव्हता. पण अखेरच्या क्षणी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपाकडून पाच उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले जातील, हे स्पष्ट झालं आहे. सदाभाऊ खोत यांनी भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता.
अजित पवार यांनी आमच्या सोबत
यावे : राधाकृष्ण विखे पाटील
भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना, तुम्ही परत आमच्यासोबत या असं म्हटलं आहे. विखे पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि शब्द पाळणारे नेते आहेत, असं देखील राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. याचबरोबर देवेंद्र फडणवीसांसोबत काम करण्यासाठी पुन्हा भाजपा सोबत यावे, असा सल्ला देखील दिला आहे. “अजित पवार स्पष्टवक्ते आहे, दिलेला शब्द पाळणारे आहेत. त्यांना माझा एवढाच सल्ला आहे की तुम्ही परत आमच्यासोबत या.” असं भाजपा राधाकृष्ण विखे पाटील वाढदिवसानिमित्त दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले आहेत.
पुणे ATS ची मोठी कारवाई, लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याला घातल्या बेड्या
दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या तरूणाला पुण्यातील दहशतवादी विरोधी पथकानं उत्तर प्रदेशात अटक केली आहे. इमानूल हक असं या तरूणाचं नाव असून त्याला उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये अटक करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेल्या बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद या तरूणाला एटीएसनं यापूर्वी अटक केली होती. इमानूल त्याच्या संपर्कात होता. त्याला पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
राहुल गांधी अंमलबजावणी
संचालनालयासमोर (ईडी) हजर
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले आहेत. जवळपास तीन तास राहुल गांधींची चौकशी सुरु होती. तीन तासांच्या चौकशीनंतर राहुल गांधी ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. चौकशीत नेमकं काय झालं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान बाहेर आल्यानंतर राहुल गांधी रुग्णालयात दाखल असलेल्या सोनिया गांधींना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. यानंतर चौकशीच्या दुसऱ्या फेरीसाठी ते पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. तत्पूर्वी राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचण्याआधी कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली.
केंद्रातील हुकूमशाहीला लोकशाही मार्गानेच उत्तर देऊ – नाना पटोले
“केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार मनमानी व अहंकारी असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना कधीही घाबरला नाही व घाबरणारही नाही. काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी व राहुल गांधी हे या हुकूमशाही सरकारला सातत्याने जाब विचारत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे. परंतु अशा हुकूमशाहीला काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या मार्गाने चोख उत्तर देईल. हम डरेंगे नहीं, लडेंगे और जितेंगे, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये
पावसाचे आगमन, बळीराजा सुखावलाय
राज्यात मान्सूनच्या सरी बरसण्यास सुरूवात झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. बीड, जालना, नाशिकसह दक्षिण कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. व्यापा-याचा खळ्यावर साठवलेला मका पूर्णपणे भिजला. व्यपा-याचं यात मोठं नुकसान झालयं. नाशिकच्या सटाणा तालुक्यात धुवाँधार पाऊस पडलाय. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसानं सखल भागात पाणी साचलं. शेत शिवारातही पाणीच पाणी झालं. या पावसानं नदी-नाले भरून वाहु लागलेत. हा पाऊस शेतीसाठी फायदेशीर असल्यानं बळीराजा सुखावलाय.
औरंगाबादमध्ये पत्नीपीडित पुरूषांनी
साजरी केली पिंपळ पौर्णिमा
औरंगाबादमधील वाळूंज परिसरामधील पत्नीपीडित पुरुषांनी चक्क पिंपळपोर्णिमा साजरी केलीय. उद्या म्हणजेच मंगळवारी, १४ जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार असतानाच वाळूंजमध्ये पत्नीपीडित पुरुषांनी सात जन्म काय सात सेकंदही ही पत्नी नको असं म्हणत पिंपळाला १०८ उलट्या फेऱ्या मारल्यात.
अनेक वर्षांपासून जे पुरुष पत्नीपासून पीडित आहेत. आपल्याला कोणीही मदत करतानाही दिसत नाही. त्यामुळेच अशापद्धतीच्या प्रतिकात्मक आंदोलनाच्या माध्यमातून हे पुरुष आपलं म्हणणं समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात. २०१२ साली स्थापन झालेल्या ‘पत्नीपीडित पुरुष आघाडी’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम करण्यात आला.
रशियाकडून एस-४०० मिसाईल
सिस्टिम वेळेवर मिळणार
एकीकडे रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये युद्ध सुरु असताना भारत देशाला रशियाकडून एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टिम वेळेवर आणि कोणताही अडथळा न येऊ देता पुरवल्या जातील असे विधान रशियन राजदूत डेनिस अलिपोव यांनी केले आहे. भारत आणि रशिया यांच्यातील राजनैतिक संबंधाला या वर्षी ७५ वर्षे झाले आहेत. रशियामधील डायजेस्ट या नियतकालीकामध्ये अलिपोव यांनी वरील भाष्य केले आहे.
SD social media
9850 60 3590