दिल्लीपाठोपाठ कटकमध्ये झालेल्या टी20 सामन्यातही टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाली आहे. या मालिकेत भारतीय क्रिकेट टीमचा नियमित कॅप्टन रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेत टीम इंडियाला रोहितची अनुपस्थिती सर्वाधिक जाणवत आहे. कारण, यावर्षी रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाला प्रत्येक सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे.
टीम इंडियानं 2022 साली रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये एकूण 11 सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यात भारतीय टीम विजयी झाली आहे. भारतानं आयपीएलपूर्वी श्रीलंकेविरूद्धची टेस्ट सीरिज 2-0 नं जिंकली. मोहालीमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये एक इनिंग आणि 222 रननं विजय मिळवला. तर बेंगळुरू टेस्टमध्ये 238 ऱननं श्रीलंकेला पराभूत केलं. रोहितच्या कॅप्टनसीमध्ये भारतीय टीमनं वेस्ट इंडिज विरूद्धची वन-डे आणि टी20 मालिका तसंच श्रीलंका विरूद्धची टी20 मालिका देखील जिंकली आहे.
रोहितच्या अनुपस्थितीमध्ये यावर्षी सात आंतरराष्ट्रीय सामने टीम इंडियानं खेळले असून सर्वांमध्ये पराभव सहन केला आहे. या सामन्यांमध्ये विराट कोहली, केएल राहुल आणि ऋषभ पंत हे कॅप्टन होते. कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाचा केपटाऊन टेस्टमध्ये पराभव केला. तर केएल राहुलच्या कॅप्टनसीमध्ये जोहान्सबर्ग टेस्टसह आफ्रिकेत झालेले तीन वन-डे सामने भारतानं गमावले.
दक्षिण आफ्रिका विरूद्ध सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत रोहितसह विराट आणि बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर नियोजीत कॅप्टन केएल राहुल मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी जखमी झाला. राहुलच्या अनुपस्थितीमध्ये पंत कॅप्टनसी करतोय. पंतलाही पराभवाची मालिका तोडता आलेली नाही. पंतच्या कॅप्टनसीमध्ये दिल्ली आणि कटकमध्ये झालेल्या टी20 मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे.