भाजपचे नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची अचानक मंचावर तब्येत खराब झाली. गडकरी यांची शुगर कमी झाल्यामुळे मंचावर चक्कर आली आणि ते कोसळले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. तातडीने डॉक्टरांना बोलवण्यात आलं आहे. सध्या गडकरी यांची प्रकृती स्थिर आहे.
नितीन गडकरी हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहे. आज सिलिगुडी इथं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींच्या शुगरचे प्रमाण अचानक कमी झाले. त्यामुळे त्यांना चक्कर आली. तातडीने डॉक्टरांना बोलावण्यात आलं. 3 वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नितीन गडकरी यांच्यावर उपचार सध्या सुरू आहे. नितीन गडकरी यांची ECG केलं जाणार आहे. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती स्थिर आहे.
याआधीही नितीन गडकरी यांना या समस्येला तोंड द्यावे लागले होते. 2019 मध्ये नितीन गडकरी हे हिमाचल प्रदेशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले असता सभेदरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना शिमला येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. शुगर लो झाल्याने गडकरींची प्रकृती बिघडली होती. किनौरमधील सांगला येथे प्रचारसभा आटोपल्यानंतर नितिन गडकरी कुफरीला परतत होते. यादरम्यान गडकरींची प्रकृती अचानक बिघडली. नितीन गडकरी हे छराबडा येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. शिमल्याहून आयजीएमसीचे डॉक्टरांचे एक पथक तातडीने छराबडा रवाना झाली होती.
नितीन गडकरींना शिर्डीच्या भरसभेत आली होती भोवळ
त्याआधी 2019 मे महिन्यात नितीन गडकरी यांना शिर्डीच्या सभेत भोवळ आली होती. प्रखर उन्हामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. याआधीही राहुरीमध्ये विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात गडकरींना भोवळ आली होती.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ नितिन गडकरी आले होते. ते संबोधित करणार तेवढ्यात त्यांना भोवळ आली. ते तातडीने खुर्चीवर बसले. नंतर त्यांना बरे वाटले. नंतर त्यांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले होते.
गडकरींची मेडिकल हिस्ट्री
– आधीपासून मधुमेहाचा त्रास
– सप्टेंबर 2001 – कारचा भीषण अपघात
– अपघातानंतर वर्षभर अंथरुणावर
– नंतर औषधांमुळे वजन वाढलं
– सप्टेंबर 2014 मध्ये वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया