दहावी बारावी लेखी परीक्षेसाठी अर्धा तास आणि पंधरा मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून (MSBHSE) दहावी बारावीचं सविस्तर वेळापत्रक जाहीर केलं आहे. मंडळानं विद्यार्थ्यांच्या प्राथमिक माहितीसाठी वेळापत्रक वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेलं आहे. याशिवाय वेळापत्रक शाळांना पाठवलं जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. शाळांमध्ये पाठवण्यात आलेल्या ऑफलाईन वेळापत्रकावरच विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा, असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे. याशिवाय यंदाच्या दहावी बारावीच्या लेखी परीक्षांमध्ये विद्यार्थी हिताचा बदल करण्यात आला आहे. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी अर्धा तास आणि पंधरा मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

दहावी बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झालेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळानं या गोष्टीची दखल घेत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे. 70, 80, 100 मार्काचे लेखी परीक्षेचे पेपर असतील त्या पेपर साठी 30 मिनिटे अधिक वेळ दिलेला आहे. तर 40, 50, 60 गुणांचे लेखी पेपर असतील त्यासाठी 15 मिनिटे अधिक वेळ देण्यात आल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर ट्विट करुन दहावी बारावीच्या परीक्षा कशा होणार याबद्दलचा संभ्रम दूर झाल्याचं म्हटलं आहे. मुंबई दहावी आणि बारावीच्या परीक्षेबद्दलचा संभ्रम दूर झाला असून त्या नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. यानंतर आता परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शाळांनी mahahsscboard.in वेळापत्रक पाहण्यासाठी या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलंय. बारावीच्या परीक्षा (HSC) 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान पार पडणार आहेत. 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत. तर त्यानंतर दहावीच्या (SSC) परीक्षांना सुरूवात होणार आहे. दहावीच्या परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान पार पडणार आहेत. 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दहावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.