ओमायक्रॉन वाढत राहिल्यास,
शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो
देशातील एकूण २१३ ओमायक्रॉन प्रकरणांपैकी महाराष्ट्रात ५४ रुग्णांची नोंद केली गेली आहे. ओमायक्रॉनची प्रकरणे वाढत राहिल्यास, आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत,” असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. काही राज्यांमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून तिचे पालन करण्याचे निर्देश सर्वच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.
महाराष्ट्रातील तब्बल 23 हजार
महिला गायब झाल्याची नोंद
महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातील तब्बल 23 हजार महिला गायब झाल्याची नोंद आहे. महिलांवरील अत्याचारांचा मुद्दा कमालीचा ऐरणीवर आला आहे. या महिलांबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
गेल्यावर्षी राज्यातून ६३ हजार २५२ महिला बेपत्ता झाल्या. 23 हजार महिलांचा शोधच लागलेला नाही. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालात ही धक्कादायक बाब उघड झालीय. राज्यात २ हजार १६३ खून झाले त्यापैकी ५६४ खून महिलांचे झालेत. प्रेमप्रकरणातून ११६ तर अनैतिक संबंधांतून १८३ जणींची हत्या झाली.
पंतप्रधान मोदींची नक्कल केल्यामुळे
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये तुंबळ खडाजंगी पाहायला मिळाली. राज्यातील वीजजोडणी आणि कनेक्शन कापण्याच्या मुद्द्यावरून लक्षवेधी चर्चेदरम्यान ऊर्जमंत्री नितीन राऊत यांनी आधी पंतप्रधानांनी नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचं विधान केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेतल्यानंतर भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांची नक्कल करून दाखवली. यावरून विरोधकांनी गोंधळ सुरू केला.
तृणमूल काँग्रेसकडून गोव्यात
विधानसभा लढण्यासाठी तयारी सुरु
गोव्यात विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तृणमूल काँग्रेसकडून सध्या जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी तृणमूल काँग्रेस स्पर्धेत कुठेच नसल्याचं म्हटलं आहे. पणजी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांना मला वाटतं तुम्ही लोक तृणमूल काँग्रेसला जरा जास्तच महत्व देत आहात असं सांगत टोला लगावला.
चिनी मोबाईल कंपन्यांच्या
कार्यालयांवर छापे
देशभरातील चिनी मोबाईल कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकण्याचे काम सुरू आहे. सकाळी ९ वाजल्यापासून दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, मुंबई, हैदराबाद, बंगळुरूसह अनेक शहरांमध्ये शोध घेण्यात येत आहे. याआधी मंगळवारी नेपाळनेही अनेक चिनी कंपन्यांना काळ्या यादीत टाकले असल्याची माहिती समोर आली होती. चिनी मोबाईल कंपन्यांनी नियम मोडले असून आता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती समोर आली आहे.
जॉर्डनच्या राजकुमारी घटस्फोटानंतर
५ हजार ५०० कोटी रुपये पोटगी मिळणार
जॉर्डनच्या राजकुमारी तसेच संयुक्त अरब अमिरातचे (युएई) पंतप्रधान आणि दुबईचे राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांच्या सहाव्या पत्नी म्हणजेच दुबईच्या राणी हया बिंत अल हुसैन यांना घटस्फोटानंतर ५ हजार ५०० कोटी रुपये पोटगी मिळणार आहे. लंडनमधील उच्च न्यायलयाने मुलांच्या कस्टडी संदर्भातील खटल्यामध्ये हा महत्वपूर्ण निर्णय दिला. निर्णयामुळे हया बिंत अल हुसैन पुन्हा चर्चेत आल्यात.
शुल्क भरण्यास ३० हजार रुपये
नसल्याने तरुणीची आत्महत्या
पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चशिक्षित तरुणीने शुल्क भरण्यास ३० हजार रुपये नसल्याने चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नम्रता गोकुळ वसईकर असं २४ वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. नम्रताचं बिटेक शिक्षण झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी नम्रताच्या भावाला नोकरी लागली होती. तिलादेखील हिंजवडीत चांगली नोकरी लागेल या आशेवर अवघं कुटुंब शहरात स्थायिक झालं होतं.
दर मिनिटाला स्विगीवरुन
११५ बिर्याणींची ऑर्डर
सालाबादप्रमाणे यंदाही ऑनलाइन फूड डिलेव्हरी अॕप असणाऱ्या स्विगीचा वार्षिक अहवाल समोर आला आहे. भारतीय कोणते पदार्थ सर्वाधिक मागवतात यासंदर्भातील अहवालामध्ये बिर्याणीने पुन्हा एकदा बाजी मारलीय. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण दर मिनिटाला स्विगीवरुन ११५ बिर्याणींची ऑर्डर दिली जाते. तर भारतामध्ये या वर्षी स्विगीवरुन मागवलेल्या सामोश्यांची संख्या ही न्यूझीलंडच्या लोकसंख्येइतकी आहे. या वर्षी स्विगीवरुन भारतीयांनी तब्बल ५० लाख समोश्यांची ऑर्डर दिलीय. स्विगीवरुन मागवण्यात आलेल्या सर्वाधिक लोकप्रिय स्नॅक्स प्रकारामध्ये समोसा अव्वल क्रमांकवर आहे.
SD social media
9850 60 3590