राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली. पवार यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पवार यांच्या तपासण्यात करण्यात आल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास झाल्याचं निष्पन्न झालं आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. पवार यांच्यावर ३१ मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचंही ते म्हणाले.
रविवार सायंकाळी शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. तपासणीतून त्यांना पित्ताशयाचं निदान झालं आहे. त्यामुळे शरद पवार यांना पुन्हा ३१ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून, एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
“आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना थोडं अस्वस्थ वाटत होतं. काल संध्याकाळी पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं तपासण्या झाल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं आहे. शरद पवारांना हा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना देण्यात येणारी रक्त पातळ करण्याची औषधं थांबवण्यात आली आहेत. त्यांना ३१ मार्च २०२१ रोजी रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे. तिथे त्यांची एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील सूचनेपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत,” अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विट करून दिली आहे. पुढील काही काळात ते पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये प्रचार दौरेही करणार होते. मात्र, अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळो
सर्वच स्तरातून शरद पवारांसाठी चिंता व्यक्त केली जात असताना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. “कालपासून पवार साहेबांची तब्येत नरम आहे असं कळालं होतं. मुख्यमंत्र्यांना भेटलो तेव्हाही आम्ही त्याविषयी चर्चा केली. सकाळी सुप्रियाताईंकडून समजलं की त्यांची तब्येत थोडी नाजूक आहे. त्यांना ८ ते १० दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यांना लहानशी शस्त्रक्रिया देखील करावी लागणार आहे. आम्ही प्रार्थना करतोय की त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळो आणि आमच्यापेक्षा तरूण असलेले ते नेते पुन्हा आमच्यासोबत कामाला लागोत”, असं संजय राऊत म्हणाले.