आमदार चव्हाणांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या संघटकपदाचा राजीनामा

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी प्रश्‍नासाठी जे आंदोलन केले आणि त्यामुळे त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला, त्यामुळे व्यथित होऊन येथील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या संघटक विजया पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे येथील शिवसेनेच्या नगरसेविका तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाब वाघ यांना दिलेल्या राजीनामा पत्रात नमुद केले आहे.
सौ. पवार यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे, की शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी शिवसेनेने वेळोवेळी आवाज उठवला आहे. आज तालुक्यातील शेतकरी अडचणीत असताना तब्बल सात हजार शेतकऱ्यांच्या वीज पंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. याचा निषेध म्हणून तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावला जाऊन उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात आंदोलन केले. आपल्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी उलट आमदार चव्हाणांसह शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. आमदारांची भूमिका योग्य असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे फोन आपल्याला आले. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी आमदारांची ही कृती गुंडगिरीची असेल तर शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कंपनीकडून त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा प्रकार गुंडगिरीच आहे. मी देखील एक शेतकऱ्याची पत्नी, बहीण व मुलगी आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी आवाज उठवणाऱ्या आमदारांना झालेल्या अटकेमुळे व्यथित झाले आहे. या संदर्भात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यात आपले सरकार असताना शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर मला शिवसेना महिला आघाडीच्या संघटक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार वाटत नाही. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांच्या भूमिकेला पाठिंबा म्हणून मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे सौ. पवार यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.