चाळीसगाव शहरातील फुले कॉलनी परिसरातील बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील रोख रकमेसह सुमारे पाच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. भर वस्तीत ही चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
येथील जमीन खरेदी विक्री करणारे एजंट अशोक श्रीधर येवले हे त्यांची पत्नी शारदा यांची तब्येत ठीक नसल्याने सोमवारी (२२ मार्च) सकाळी त्यांना उपचारार्थ नाशिक येथे घेऊन गेले होते. तेव्हापासून श्री. येवले नाशिकलाच होते. काल सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याचे आढळून आले. श्री. येवले यांचे मोठे भाऊ प्रकाश येवले यांनी ही माहिती अशोक येवले यांना कळविल्यानंतर ते दुपारी घरी आले असता, घरातील बेडरूममधील लाकडी कपाटातील कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्त केलेले आढळून आले. कपाटाची पाहणी केली असता, त्यातील ४८ वजनाचे सोन्याचे दागिने व तीन लाख १५ हजार रुपयांची रोकड असा एकूण सुमारे चार लाख ६५ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. याबाबत श्री. येवले यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल टाकले व कर्मचाऱ्यांनी येऊन पाहणी केली. चोरीच्या तपासासाठी जळगाव येथील श्वानपथकासह ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. त्यादृष्टीने पोलिसांनी चोरीचा शोध घेणे सुरु केले आहे. याबाबत पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास श्री. टकले करीत आहेत.