मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता राज्यभरात होऊ घातलेल्या आंदोलनांबाबत भाजपने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात भाजपचे (BJP) कार्यकर्ते सहभागी होतील. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ही माहिती दिली.
ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप मराठा आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा केली. मराठा समाजाच्या नावाने आणि नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यामध्ये भाजप पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल, असे जगदीश मुळीक यांनी सांगितले. महाविकासआघाडी सरकार मराठा समाजाचा प्रक्षोभ दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भाजप हा डाव हाणून पाडेल, असे जगदीश मुळीक यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द ठरवले होते. त्यानंतर राज्यातील अनेक मराठा नेत्यांनी आंदोलनाची हाक दिली होती.
यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळात कोणतेही राजकीय पाठबळ नसताना मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यभरात प्रचंड मोठे मोर्चे काढण्यात आले होते. या सर्व मोर्चांमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी असूनही योग्य नियोजनामुळे हे मोर्चे शांततापूर्ण पद्धतीने पार पडले होते. आता यामध्ये भाजप सहभागी झाल्यास मराठा आंदोलकांची ताकद आणखी वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात या सगळ्या घडामोडींचे राज्यात काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही, तीव्र आंदोनल करण्यात येईल. मंत्र्यांना फिरू देणार नाही त्यांच्या गाड्या अडवणार. महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. येत्या 18 मे रोजी राज्यभर तहसीलदारांना निवेदन देणार तसेच 5 जूनच्या आसपास मोर्चा काढणार असल्याची घोषणा शिवसंग्राम संघटनेचे नेत विनायक मेटे यांनी केली आहे.