तर लाहोर भारतात राहिले
असते : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंजाबमध्ये मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना देशभरातलं राजकीय वातावरण तापलं आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच तिथल्या सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज नेतेमंडळी पंजाबमध्ये प्रचारसभा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप होत असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. यासाठी मोदींनी तीन घटनांचा उल्लेख केला असून त्या वेळी जर फक्त ६ किलोमीटर पुढे भारतीय सैन्य गेलं असतं, तर गुरूनानक देव यांची तपोभूमी लाहोर भारतात राहिली असती, असं देखील मोदी म्हणाले आहेत. पंजाबमध्ये एका प्रचारसभेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी देशाची फाळणी, १९६५ चं भारत-पाकिस्तान युद्ध आणि १९७१ चं बांगलादेश युद्ध या तीन घटनांचा उल्लेख केला आहे.
अजित डोवाल यांच्या सरकारी
बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारतीय गुप्तचर यंत्रणेचे सर्वोच्च अधिकारी अजित डोवाल यांच्या सुरक्षेसंदर्भातील मोठा गोंधळ समोर आलाय. आज १६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी एक अज्ञात व्यक्तीने कारसहीत अजित डोवाल यांच्या सरकारी बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंगल्याच्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवत या व्यक्तीला रोखलं आणि मोठा अनर्थ टळला. या व्यक्तीला पोलिसांच्या विशेष तुकडीच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.
युक्रेनच्या सीमेवरील तणाव
निवळण्याची आशा
युक्रेनच्या सीमेनजीक असलेल्या रशियाच्या लष्करी छावण्यांतील सैनिकांच्या काही तुकडय़ा सराव संपल्यानंतर माघारी परतल्याचे रशियाच्या संरक्षण खात्याने मंगळवारी जाहीर केले. यामुळे युक्रेन सीमेवरील तणाव कमी होण्याची आशा आह़े मात्र, ‘नाटो’ने अद्याप प्रत्यक्षात परिस्थितीत सुधारणा दिसत नसल्याचे नमूद करत सावध पवित्रा घेतला़. रशियाने १,३०,००० सैनिक युक्रेन सीमेनजीक तैनात केले आहेत़. रशियाचे सैनिक युक्रेनवर हल्ला करू शकतील, असा इशारा अमेरिका आणि ब्रिटनने दिला होता.
देशाची वाटचाल अराजकतेकडे
सुरु : डॉ. भालचंद्र मुणगेकर
देशासमोर आर्थिक प्रश्न गंभीर आहे. विषमता वाढत चालली आहे. रोजगार निर्मिती होत नाही. शिक्षण आरोग्याचे खासगीकरण होत चालले आहे. पण या आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकारकडे सशक्त धोरण नाही. त्यामुळे देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरु आहे. हे असेच सुरु राहिले तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. ते अलिबाग येथे सहयोग पतसंस्थेच्या वतीने आयोजित भारताची विद्यमान अर्थव्यवस्था या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते.
मार्क झुकरबर्गनं केली ‘मेटामेट्स’ची
घोषणा, कंपनीचं ब्रीदवाक्यही बदललं
गेल्या महिन्याभरात फेसबुकची कमी झालेली युजर्सची संख्या, मार्क झुकरबर्गच्या वैयक्तिक संपत्तीत तसेच शेअर्समध्ये झालेली घट या पार्श्वभूमीवर फेसबुकमध्ये लवकरच काही नव्या उपाययोजना पाहायला मिळण्याची शक्यता अनेक व्यवसाय तज्ज्ञ व्यक्त करत होते. अखेर त्याची घोषणा खुद्द मार्क झुकरबर्गनंच केली असून फेसबुकच्या कर्मचाऱ्यांचं त्यानं बारसंच करून टाकलं आहे. याशिवाय इतर काही गोष्टींसोबतच कंपनीचं ब्रीदवाक्य देखील त्यानं बदलून टाकलं आहे. काही महिन्यांपूर्वीच फेसबुकच्या मूळ कंपनीचं नामकरण ‘मेटा’ असं करण्यात आलं होतं.
सुविधांसाठी आम्ही भ्रष्टाचार
केला : उदयनराजे
फेसबुक पोस्टमध्ये उदयनराजे म्हणतात, सातारा शहराच्या व शहरवासीयांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही सुरु केलेली इनोव्हेटीव्ह सातारा ही योजना, समाजाची आणि समाजहित साध्य करुन घेण्याची चिरकाल चालणारी योजना आहे. लोकांना इनोव्हेटीव्ह सातारा या शब्दाचा अर्थ आणि शब्दाचे स्पेलिंग अचूक सांगता येणार नाही त्यांनी आमच्या इनोव्हेटीव्ह सातारा या उपक्रमाविषयी काही बोलू नये. लोकांच्या गतीमान सोयी , सुविधांसाठी कोणत्या योजना राबविणे, लोकहिताची अंमलबजावणी करणे ही जर भ्रष्टाचाराची व्याख्या असेल तर होय.. आम्ही भ्रष्टाचार केला आहे.
माणसाला कोंबडीएवढं ज्ञान असलं
तरी पुरे झालं : सयाजी शिंदे
एका पत्रकारने सयाजी शिंदेंना वाइन विक्रीसंदर्भातील प्रश्न विचारला. त्यावर आधी प्रश्न ऐकून सयाजी शिंदे हसले. त्यानंतर त्यांनी चांगल्या वाईट गोष्टींचं ज्ञान आपलं आपल्याला हवं असं मत व्यक्त केलं. प्रश्नाला उत्तर देताना सयाजी शिंदेंनी, “जगात चांगल्या वाईट सगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. कोंबडीला सांगता येत नाही की दगड खा अन् माती खा. माणसाला कळलं पाहिजे ना दगड खायचे की माती खायची. त्यामुळं कोंबडीएवढं ज्ञान असलं तरी पुरे झालं,” असं म्हटलं. सयाजी शिंदेंनी दिलेलं उदाहरण आणि प्रतिक्रिया ऐकून उपस्थितांना एकच हसू फुटलं.
ते काही अमरपट्टा घेऊन
आलेले नाहीत : नाना पटोले
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून दबावतंत्राचा वापर होतोय, हे लोकशाहीला घातक आहे. आम्ही भाजपची सर्व काळी कृत्ये जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. भाजपाला महाराष्ट्रची जनता त्यांची जागा दाखवेल.आज त्यांचा वेळ आहे पण वेळ बदलेल ना, हे काही अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत. महाविकास आघाडी पाडण्यासाठी अनेकदा प्रलोभन आणि दबावतंत्राचा वापर झाला, हा खऱ्या अर्थाने मोठा आक्षेप आहे. असं म्हणत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला.
दोन वर्षांत सिंगापूरमध्ये इलेक्ट्रिक
एअर टॅक्सी सुरू करण्याची योजना
येत्या दोन वर्षांत सिंगापूरमध्ये इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सुरू करण्याची योजना आखत आहे. यासाठी इंडोनेशिया आणि मलेशिया सारख्या जवळच्या गंतव्यस्थानांसाठी फ्लाइट ऑफर करण्यासाठी चर्चा करत आहे. कंपनीच्या आशियाई विस्ताराच्या हालचालीचा एक भाग म्हणून याकडे पाहिलं जात आहे. व्होलोकॉप्टरने सिंगापूरमध्ये देखभाल कार्ये सुरू करण्याची योजना देखील आखली आहे. आशियामध्ये इलेक्ट्रिक वर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग विमानांच्या निर्मितीचा अभ्यास करत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीफ कमर्शियल ऑफिसर ख्रिश्चन बौअर म्हणतात की त्यांच्या कंपनीचे मरीना बे आणि सेंटोसा या लोकप्रिय पर्यटन स्थळांभोवती १० ते २० हवाई टॅक्सी चालवण्याचे उद्दिष्ट आहे.
गोदावरीच्या काठावर
पुरोहितांमध्ये तुफान राडा
मंदिरांची नगरी असलेल्या नाशकात सध्या पूजाविधीवरून भलताच वाद रंगला आहे. एकमेकांचे यजमान पळवण्यावरून पुरोहितांच्या दोन गटांमध्ये सोमवारी चक्क जोरदार राडा झाला. नाशकात श्रद्धेचा बाजार कसा सुरू आहे याचा धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आला आहे. गोदावरीच्या काठावर पुरोहितांमध्ये तुफान राडा झाला. रामकुंडासारख्या पवित्र तीर्थक्षेत्रावर सुरू असलेली ही वादावादी झाली आणि वाद कशावरून? तर यजमान पळवण्यावरून हा वाद पेटला.
ज्येष्ठ गायक-संगीतकार
बप्पी लाहिरी यांचे निधन
अंगभर सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या रुपामुळे परिचित असलेले ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत बातमी दिली आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्येष्ठ गायिका संध्या मुखर्जी यांचं निधन
कलाविश्वाला गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर बंगालच्या ज्येष्ठ गायिका संध्या मुखर्जी यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्या 90 वर्षांच्या होत्या… त्यांचं निधन झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली. त्यांच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.
SD social media
9850 60 35 90